मुंबई : मुंबईच्या आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला आज आमदार नितेश राणे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठिशी आम्ही ठामपणे उभे राहू, सरकारला नमवायचं असेल तर एकजूट दाखवायला हवी, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट पाडायचा प्रयत्न करु नका असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. तुमच्यासाठी महाराष्ट्र पेटवू शकत नाही का आम्ही, तुम्ही आत्महत्या करताय म्हणजे तुमचा आमच्यावर विश्वास कमी झाला आहे का. भाजप नेते कमी पडतायत म्हणून आत्महत्या करताय अशी तुमची भावना आहे का? असा सवाल नितेश राणे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना विचारला.


आपण शिवरायांच्या महाराष्ट्रात राहतोय, स्वराज्यासाठी लढा देताना कधीही मावळ्यांनी हार पत्करली नाही, आत्महत्या केली नाही. बलाढ्य मोघलांसमोर ते लढले. थोड्याशा मावळ्यांना घेऊन ते लढले. 


तेच मोघलांचं सरकार आज सरकारमध्ये बसलं आहे. अतिरेकींचं सरकार आहे, 93 बॉम्बस्फोटातले मंत्री मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यांना झोपवायचं असेल तर तुमची एकजूट महत्त्वाची आहे, असं आवाहन नितेश राणे यांनी केलं.


कोण फितूर होत असेल तर माझ्याकडे पाठवा, माझ्याकडे सर्व वॅक्सिन आहेत, मला बुस्टर डोसची पण गरज नाही. काय करायचं ते बघतो. आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न कुणी करत असेल तर गाठ नितेश राणेंशी आहे.


उद्या राज्यभर आंदोलन आहे, आम्ही सर्व पाठिशी उभे आहोत, आम्ही पण बघतो किती लोकांचं निलंबन करतायत. कर्मचाऱ्यांचं निलंबन झालं तर मंत्री कसे बाहेर फिरतात ते पाहू, असा इशाराही नितेश राणे यांनी दिला आहे.


कायदा आणि सुव्यवस्था तुम्ही खराब करत आहात हे आम्ही अनिल परब यांना सांगू, तुमच्यात हिम्मत असेल तर या आझाद मैदानात, बसा तुमच्या कामगारांबरोबर. कोरोना काळात जेव्हा मुख्यमंत्री घरी बसले होते, तेव्हा हेच कामगार सगळीकडे सेवा देत होते. वेळ पडल्यास एसटीचा मुद्दा अधिवेशनातही मांडू असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.