मुंबई : कोहिनूर खरेदी कथीत गैरव्यवहारप्रकरणी आज राज ठाकरेंची ईडीच्या कार्यालयात गेले सुमारे साडे आठ तास चौकशी सुरु आहे. ११.३० च्या दरम्यान राज ठाकरे चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहोचले. तब्बल साडेआठ तासाहून अधिक वेळ लोटला तरी अजून ही चौकशी सुरुच आहे. दरम्यान मनसे कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल वाढली आहे. या कारवाईविरोधात बंद आणि इतर पद्धतीने निषेध करण्याचा इशारा मनसेने दिला होता. मात्र राज ठाकरेंनी शांतता बाळगण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना दिलंय. त्यामुळे कोणत्याही आंदोलनाची घोषणा करण्यात आली नसली तरी ऐनवेळी विरोध प्रदर्शन केला जाण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असं काहीही करू नका नाही तर कारवाई केली जाईल अशा सूचना मनसे कार्यकर्त्यांना नोटिशीच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. बुधवारी दुपारपासूनच पोलिसांनी मनसेच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. तसंच राज ठाकरे यांच्या घराबाहेरचा पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आलाय. 



महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना शिवाजी पार्क पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होईल, असे कोणतेही कृत्य मनसेच्या कार्यकर्त्यांनी करू नये, यासाठी मनसेच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. 


कायदा आणि सुव्यवस्थेत अडथळा आणला तर कडक कारवाई केली जाईल अशा इशाराही पोलिसांनी दिला आहे. याआधी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.