राज ठाकरे यांना भाजपचा `बुस्टर डोस`, ठाकरे सरकारवर धडाडणार दुहेरी तोफा
मनसेपाठोपाठ भाजपचंही ठरलं! महाराष्ट्र दिनी होणार `बुस्टर डोस` सभा
Maharashtra Politics : राज्यात ठाकरे विरूद्ध ठाकरेचा सामना सुरू असताना आता भाजपनंही (BJP) त्यात उडी घेत राज ठाकरेंना बुस्टर डोस देण्याची तयारी सुरू केली आहे. राज ठाकरे (Raj Thckeray) यांनी 1 मे रोजी औरंगाबादेत (Aurangabad) जाहीर सभा घेणार असल्याची घोषणाही केल्यानंतर आता या सभेला उत्तर देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी 14 मे रोजी सभा घेणार असल्याचं जाहीर केलं.
ठाकरे बंधूंचं सभा संघर्ष कमी होता की काय म्हणून आता यात भाजपनंही उडी घेतलीय. भाजपनं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या जाहीर सभेची घोषणा करण्यात आलीय. मुंबईतल्या सोमय्या मैदानावर ही सभा होणार असून या सभेला बुस्टर डोस सभा असं नाव देण्यात आलंय. अर्थात हा बुस्टर डोस ठाकरे सरकारला घेरण्यासाठी आणि राज ठाकरेंना ताकद देण्यासाठीच असेल हे उघड आहे.
सध्या राज्यात हनुमान चालिसा आणि मशिदीवरील भोंग्यांचा मुद्या चांगलाच तापलाय. राणा दाम्पत्याच्या अटकेनं राज्याचं वातावरण ढवळून निघालंय. यानिमित्तानं विरोधकांनी सत्ताधा-यांना कोंडीत पकडण्यासाठी जय्यत तयारी केलीय.
भोंग्यांच्या मुद्यावर राज ठाकरेंनी आक्रमक पवित्रा घेतल्यानं ठाकरे सरकारसमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यात आता महाराष्ट्र दिनाला राज ठाकरेंसोबत भापनंही महाविकास आघाडीवर हल्लाबोल करण्याची रणनीती आखल्यामुळे राज्यात डबल धमाका पाहायला मिळणार आहे.