मुंबई : मल्टीप्लेक्सच्या मनमानीविरोधात मनसेनं आक्रमक भूमिका घेतलीय.  खाद्यपदार्थांसाठी आकारत असलेल्या अव्वाच्या सव्वा दर आकारण्याच्या विरोधात मनसे कार्यकर्त्यांनी पुण्यातल्या पीव्हीआरमध्ये जोरदार राडा केला. पाच रुपयांचे पॉपकॉर्न २५० रुपयांना कसे? १० रुपयांचा वडापाव शंभर रुपयांना कसा? असे फलक घेऊन आणि घोषणा देऊन मनसैनिकांनी PVR दणाणून सोडलं. PVR व्यवस्थापनाला यासंदर्भातील निवेदनही  देण्यात आलं. यापूर्वीही अनेकदा या प्रश्नावर आवाज उठवूनही मल्टीप्लेक्स व्यवस्थापन आणि सरकारी यंत्रणा यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे मनसेनं अखेर आंदोलनाचा पवित्रा घेतला. मनसेकडून मिळालेल्या निवेदनावर आपण लवकरच कार्यवाही करु, असं आश्वासन व्यवस्थापनाने दिलेलं आहे. या आश्वासनाची पूर्तता होतेय का नाही याचा पाठपुरावा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना करणार असल्याचे मनसेतर्फे सांगण्यात आले. 


मनसेची भूमिका 


खाद्यपदार्थांचे दर कमी झाले नाहीत तर हे आंदोलन मनसे स्टाईल झाल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका मनसेने घेतली आहे. मनोरंजनासाठी थिएटरमध्ये जाणारे प्रेक्षक आपल्या घरातील खाद्यपदार्थ घेऊन जाऊ शकतात, असा सरकारी निर्णय आल्यानंतरही मल्टीप्लेक्स आडमुठी भूमिका घेत प्रेक्षकांना बाहेरील अन्न थिएटरमध्ये घेऊन जाण्यास मनाई करत होते. त्यावेळीही मनसे चित्रपट कर्मचारी सेनेने केलेल्या आंदोलनामुळे मल्टीप्लेक्स व्यवस्थापनाला नमतं घ्यावं लागलं होतं. खाद्यपदार्थांचे अतिमहाग दर हा तर वर्षांनुवर्ष भेडसावणारा प्रश्न आहे, या प्रश्नाच्या मुळाशी जात याही वेळेस मुजोर मल्टीप्लेक्स व्यवस्थापनाला नमवण्यात मनसे पुन्हा यशस्वी होईल याची ग्वाही मनसे चित्रपट सेना देत आहे.