Raj Thackeray CM Poster : मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कमध्ये  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज पाडवा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागले आहे. मात्र मेळाव्यापूर्वी मनसेकडून शिवसेना भवनासमोर जोरदार बॅनरबाजी करण्यात आलीय. हे बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेतायत. या बॅनरवर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे असा अशय असलेला मजकूर छापण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, गुढीपाडवा मेळाव्याचे निमित्त साधत मनसेने शिवाजी पार्क परिसरात राज ठाकरे यांचे बॅनर लावले आहेत. मात्र, हे बॅनर स्वागताचे किंवा शुभेच्छा देण्याचे नाहीत. त्यामुळे या पोस्टरची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. मनसेकडून लावण्यात आलेल्या पोस्टरवर म्हटले आहे की, 'महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री..! हिंदुजननायक राज ठाकरे'. या नव्या पोस्टरची आता चर्चा आहे. राज ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. दादर उपशाखाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी हे बॅनर लावले आहेत. या बॅनरची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. 



मराठी नववर्ष म्हणजेच गुढी पाडव्याचा सण. या दिवशी मनेसाचा गुढी पाडवा मेळावा असतो. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता असताना त्यांचे भावी मुख्यमंत्री पोस्टर लागल्याने त्यांच्या भाषणाबद्दलची उत्सुकचा आता अधिकच शिगेला पोहोचली आहे. मनसेकडून सेनाभवन परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला हा डिवचण्याचा प्रयत्न आहे का, अशीही चर्चा होत आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पायउतार व्हावे लागले होते. दरम्यान, आपल्याला कोणी आडवे  गेले तर काय होते, हे तुम्हाला माहित आहे, असे म्हणत सरकार पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद गमवावे लागले होते. यावरुन ठाण्याच्या मेळाव्यात राज यांनी टोला लगावला होता. त्यामुळे या पोस्टरची चर्चा सुरु झालेय.


 हिंदुजननायक म्हणून असे पोस्टर झळकले होते...



दरम्यान, याआधीही राज ठाकरे यांचे हिंदुजननायक म्हणून असे पोस्टर झळकले होते. मनसे कार्यकर्त्यांनी हिंदूंचा हिंदुजनयाकक असा उल्लेख करणारे पोस्टर लावले होते. पुण्यातल्या कार्यकर्त्यांनी हिंदूजननायक असा राज ठाकरे यांचा उल्लेख केला होता. या पोस्टरची चर्चा झाली  होती. आगामी महापालिका निवडणुकांसाठी मनसेची पक्ष बांधणी सुरु झाली आहे.  आगामी निवडणुकांसाठी मनसेने कंबर कसली आहे. त्यासाठी मोर्चेबांधणी सुरु आहे. राज ठाकरेंनी महाराष्ट्राचे काही मोजके दौरे केले होते.



आज संध्याकाळी मुंबईत मनसेचा गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्कमध्ये होत आहे. शिवतीर्थावर होणाऱ्या या सभेत राज ठाकरे हे राज्यातील राजकीय परिस्थितीवर काय भाष्य करतात याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. या मेळाव्याची सध्या जय्यत तयारी सुरु आहे. या मेळाव्याचा टीझर देखील मनसेकडून जारी करण्यात आला होता. ठाण्याच्या मेळाव्यात आपण 22 तारखेला स्पष्ट बोलणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे ते काय बोलणार याची उत्सुकता आहे.