मुंबई: औरंगाबाद महापालिका आणि नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी नवी मुंबई आणि औरंगाबाद येथील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक कृष्णकुंज या निवासस्थानी घेतली. यावेळी त्यांना पदाधिकाऱ्यांना महानगरपालिका निवडणुका ताकदीने लढवण्याचा सूचना दिल्या. तसेच औरंगाबादमध्ये १२ मार्चला मनसेच्या वतीने तिथीनुसार येणारी शिवजयंती साजरी केली जाणार आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे या शिवजयंती सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, औरंगाबाद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेत संघटनात्मक नियुक्त्या ही करण्यात आल्या. मनसेत पुन्हा प्रवेश केलेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची कन्नड आणि सिल्लोड विधानसभेच्या जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या बैठकीत औरंगाबाद, नवी मुंबई महापालिका रणनीतीसंदर्भात चर्चा झाली. 


दरम्यान, राज ठाकरे यांच्याकडून आगामी औरंगाबाद दौऱ्यात शहराच्या नामांतराचा मुद्दा उचलला जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी शिवसेना औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्यासाठी आग्रही होती. मात्र, राज्यात सत्ताबदल झाल्यामुळे शिवसेना या मुद्द्यावर काही करणार नाही, असा मनसेचा आरोप आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत मनसेकडून शिवसेनेला याच मुद्द्यावरून लक्ष्य केले जाऊ शकते.