मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौ-याच्या पार्श्वभमीवर राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून जोरदार ताशेरे ओढले आहेत. अमेय खोपकर यांनी हे व्यंगचित्र ट्विट केलं आहे. अहो देश घातलात खड्ड्यात आता माझ्या नावाने गळा काढता आहात, अरे लोकांनी तुमच्याकडे रामराज्य मागितले होते, राममंदिर नाही, हे राम असं त्यांनी व्यंगचित्रात म्हटलंय. राज ठाकरे नेहमीच अनेक विषयांवर आपल्या व्यंगचित्रातून मार्किक प्रतिक्रिया देत असतात. आता पुन्हा त्यांनी अयोध्या दौऱ्याबाबत व्यंगचित्रातून टीका केली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज अयोध्या दौरा पार पडला. भाजपचा अर्थ हिंदुत्व नाही. आम्ही हिंदुत्वापासून नव्हे तर भाजपपासून विभक्त झालो आहोत. भाजप हिंदुत्वापेक्षा वेगळा आहे. त्यामुळे हिंदुत्व सोडण्याचा प्रयत्न नाही, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. यावेळी त्यांनी राम मंदिर उभारण्यासाठी १ कोटी रुपयांचा निधी देण्याचे यावेळी जाहीर केलं. मी एक भक्त आहे. त्यामुळे या भक्ताकडून ही मदत देण्यात आली असल्याचं ते म्हणाले.


मी मंदिरासाठी सरकारकडून नव्हे तर माझ्या ट्रस्टकडून हे एक कोटी जाहीर केले आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसंच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारकडे अयोध्येत महाराष्ट्रातून येणाऱ्या रामभक्तांसाठी ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी जागा देण्याचं आवाहन केलं आहे. 


मी पहिल्यांदा नोव्हेंबर २०१८ मध्ये अयोध्येला आलो. त्यावेळी शिवनेरीवरची माती मी याठिकाणी घेऊन आलो होतो. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही मी सर्व खासदारांना घेऊन अयोध्येत आलो. २०१९ च्या नोव्हेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला. त्याच नोव्हेंबर महिन्यात मी मुख्यमंत्री झालो. आता तिसऱ्यांदा मी अयोध्येत आलो आहे. मी दरवेळी यशस्वी होऊन याठिकाणी येतो. हे कायम घडत राहो, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.