Raj Thackeray on Bharatratn: भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भातील घोषणा केली. तसेच त्यांचे फोनवरुन अभिनंदनही केले. देशभरात सर्व स्तरातून आडवाणींवर कौतुकाचा वर्षावर होत आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला कानपिचक्या देत लालकृष्ण आडवाणींना शुभेच्छा दिल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत लालकृष्ण आडवाणी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सोबत उशीरा हा सन्मान दिल्याचे सांगत भाजपलाही कानपिचक्या दिल्या आहेत. राज ठाकरे आपल्य पोस्टमध्ये काय म्हणाले? हे जाणून घेऊया. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाच्या प्रमुख संस्थापकांपैकी एक लालकृष्ण अडवाणीजी ह्यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी सन्मान घोषित झाला ह्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन, असे ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात. यावेळी त्यांनी केंद्र सरकारचं देखील अभिनंदन केलं.


गेली 10 वर्ष केंद्रातील निर्विवाद सत्ता हाती असताना, ज्यांच्यामुळे भाजप आज ज्या स्थानावर आहे त्या व्यक्तीला हा सर्वोच्च सन्मान ह्या आधीच मिळायला हवा होता, अशा ठाकरी शैलीत राज ठाकरेंनी भाजपला कानपिचक्या दिल्या आहेत. अर्थात हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असल्याचेही त्यांनी सांगितले. करोडो भारतीयांचं आणि अनेक पिढ्यांचं, राममंदिराचं स्वप्न पूर्ण झालं, त्यात मोलाचा वाटा हा अडवाणीजींचाच आहे.  हे करताना त्यांनी स्वतःची राजकीय कारकीर्द पणाला लावली. राजकीय अस्पृश्यता आणि उपेक्षा सहन केल्याची आठवण राज ठाकरेंनी करुन दिली. 


आडवाणींकडे मनाचा मोठेपणा


रथयात्रेतून अडवाणीजींनी देशातील हिंदूंची अस्मिता जागृत केली आणि भारतीय जनता पक्षाचा उदय झाला. पण हे करताना 'अब की बारी अटलबिहारी' म्हणण्याइतका मनाचा मोठेपणा हा अडवाणीजींकडे होता, ही आठवण राज ठाकरेंनी करुन दिली. देशाच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून आजपर्यंतच राजकारण पाहिलेले आणि देशातील राजकारणाला वळण देणाऱ्या ज्येष्ठ नेत्याचं सर्वोच्च नागरी सन्मानासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनापासून अभिनंदन, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.