Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच मनसे प्रमुख राज ठाकरे(MNS Chief Raj Thackeray ) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. या भेटीचा कोणताही तपशिल सुरुवातीला समोर आला नाही. मात्र, स्वत:  राज ठाकरे यांनी या भेटीवर  प्रतिक्रिया दिली. या भेटीमागचे कारण राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी दुपारी राज ठाकरे थेट  देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर दाखल झाले. या भेटी दरम्यान दोघांमध्ये मुंबई- गोवा महामार्गाच्या कामासंदर्भात चर्चा झाल्याचं समजते. 15 वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावण्याची विनंती राज ठाकरे यांनी फडणवीस यांच्याकडे केली. राज ठाकरेंनी कोकण दौ-यादरम्यान महामार्गाची पाहणी केली होती. त्याची माहिती देखील राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना दिली. 


भेटीवर राज ठाकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली?


समृद्धी महामार्ग चांगल्या पद्धतीने तयार झाला. नुकताच कोकण दौरा केला होता. यावेळी कोकणातील रस्त्यांची दुरावस्था पहायला मिळाली. समृद्धी महामार्ग तयार झाला आहे पण 15 वर्षापासून कोकणाचा रस्ता रखडला आहे.
गोवा ते पुढे काही भाग तयार झाला आहे पण त्यापुढे काही झालं नाही. कोकण समृद्ध करावा तिथले रस्ते लवकर करावे याबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. 


समृद्धी महामार्गावर मुंबई ते नागपूर जायचं आहे. स्वतः एकदा कार चालवत समृद्धी महामार्गावर जायचं आहे. मात्र, प्रवासापूर्वी तिकडचे धोके पहिल्यांदा समजू घेतला आहे.  23 तारखेला एक दिवसाचा नागपूर दौरा आहे. पक्ष पदाधिकारी नियुक्तीसाठी या दौरा करणार आहे. मात्र, वेळे अभावी या दौऱ्याला विमानाने जाणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.


राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील भेटी गाठी वाढल्या


राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील भेटी गाठी वाढल्या आहेत. यापूर्वी अनेकदा राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तर, अनेक कार्यक्रमांचे निमित्त साधत देवेंद्र फडणवीस देखील राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले होते. या भेटींमुळे मनसे आणि भाजप युतीच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, या भेटीदरम्यान विविध विषयांवर चर्चा झाल्याचे प्रत्येकवेळी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे सांगण्यात आले. दरम्यान, राज ठाकरे यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा करत युतीच्या चर्चेला पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केला आहे.