राज ठाकरे यांची महत्त्वाच्या बैठकीला फक्त १० मिनिटं उपस्थिती, चर्चेला उधाण
मनसेची मुंबईत महत्त्वाची बैठक होत आहे.
मुंबई : मनसे पदाधिकाऱ्यांची आज मुंबईतल्या रंगशारदा सभागृहात महत्त्वाची बैठक सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे या बैठकीला उपस्थित होते. पण केवळ १० मिनिटं त्यांची उपस्थिती होती. पण राज ठाकरे हे १० मिनिटात का निघून गेले याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. पण राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचना केल्याची माहिती मिळते आहे. ९ फेब्रुवारीला मनसे आझाद मैदानात मोर्चा काढण्यात येणार आहे. पाकिस्तान आणि बांग्लादेशातील घुसखोरांच्या विरोधात या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चाबाबत रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. शिवसेनेत असतानाही राज ठाकरे यांची पाकिस्तानी आणि बांगलादेशी लोकांच्या विरोधात हीच भूमिका होती असा दावा मनसेचे नेते बाळा नांदगावकरांनी केला आहे.
आजच्या बैठकीत शॅडो कॅबिनेटबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. लवकरच शॅडो कॅबिनेट जाहीर होणार असल्याचंही नांदगावकरांनी नमूद केलं. २३ जानेवारीच्या राज्यव्यापी अधिवेशनानंतर मनसेची ही पहिलीच बैठक आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे फक्त १० मिनिटामध्येच बैठकीतून बाहेर पडल्याने चर्चा सुरु झाल्या आहेत. य़ा बैठकीत नेमकं काय घडलं आणि कोणते निर्णय़ घेण्यात आले याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.