राज ठाकरे `अॅक्शन मोड`मध्ये, चौथ्यांदा पुणे दौऱ्यावर
दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यात राज ठाकरे पक्षातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) उद्यापासून दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. पक्षवाढ आणि महापालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेवून या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या दौऱ्यात राज ठाकरे पक्षातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असल्याने पक्षवाढीकरीता अॅक्शन मोडमध्ये आल्याचं दिसत आहे.
राज ठाकरे उद्यापासून दोन दिवस म्हणजे 13 आणि 14 ऑगस्टला पुणे दौऱ्यावर आहेत. उद्या सकाळी दहा वाजता राज ठाकरे पुण्यात पोहचणार आहेत. दोन दिवसीय दौऱ्यात राज ठाकरे पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे गेल्या महिनाभरातील राज ठाकरे यांचा हा चौथा पुणे दौरा आहे.
पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, कल्याण डोंबिवली, नवी मुंबईसह दहा महापालिकांच्या निवडणुका पुढील वर्षाच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून राज ठाकरे काही प्रमुख शहरांना भेटी देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. आगामी निवडणुकीत मनसेचे इंजिन एकटेच धावणार, की भाजपसोबत, याबाबत कार्यकर्त्यांनाही उत्सुकता आहे.