मुंबई: नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (CAA) मोर्चे काढणाऱ्यांना आज आम्ही फक्त मोर्चा काढून प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, यापुढे जास्त नाटकं कराल तर दगडला दगडाने आणि तलवारीला तलवारीने प्रत्युत्तर देऊ, अशी गर्जना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना देशातून हुसकावून लावण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) रविवारी मुंबईत मोर्चा काढण्यात आला. यानंतर राज ठाकरे यांनी आझाद मैदानावर मनसेच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीचे (NRC)पूर्णपणे समर्थन केले. केंद्र सरकारने हे दोन्ही कायदे देशभरात तात्काळ लागू करायला पाहिजेत. जेणेकरून एकदाचा काय तो सोक्षमोक्ष होईल. CAA विरोधात मुस्लिम समाजाकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चांचा मला अर्थच लागत नाही. देशभरात CAA किंवा NRC कायदा लागू झाला तरी जन्मापासून येथे राहणाऱ्यांना कोण बाहेर काढणार? मग मुस्लिम समाज मोर्चे काढून कोणाला आपली ताकद दाखवू पाहत आहे, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला. 


मोर्चे काढून कोणाला ताकद दाखवताय; राज ठाकरेंचा मुस्लिमांना सवाल


एवढेच नव्हे तर आता आम्ही मोर्च्याला फक्त मोर्चाने उत्तर दिले आहे. यापुढे ही नाटकं अशीच सुरु राहिली तर दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिले जाईल, असे राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. 


जगातील कोणत्याही देशात नसेल इतके स्वातंत्र्य आजघडीला भारतातील नागरिकांना मिळत आहे. मग तुम्ही तोच देश बरबाद मागे करायच्या मागे का लागला आहात? देशप्रेमी मुस्लिमांनी जागरूक राहून या गोष्टीचा विचार करायला पाहिजे, असेही यावेळी राज ठाकरे यांनी सांगितले.