नवी मुंबईत `राज`वाणी; मनसेच्या शॅडो कॅबिनेटची घोषणा
महाविकासआघाडी सरकारवर वचक ठेवण्यासाठी मनसेकडून हे शॅडो कॅबिनेट तयार करण्यात आले आहे.
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) सोमवारी आपला १४ वा वर्धापनदिन साजरा करत आहे. नवी मुंबईतल्या विष्णुदास भावे सभागृहात वर्धापन दिनाचा सोहळा होत आहे. यावेळी राज ठाकरे यांच्याकडून मनसेच्या शॅडो कॅबिनेटची घोषणा होण्याची शक्यता आहे. महाविकासआघाडी सरकारवर वचक ठेवण्यासाठी मनसेकडून हे शॅडो कॅबिनेट तयार करण्यात आले आहे. यामध्ये मनसेच्या २५ ते २८ नेत्यांचा समावेश असल्याचे सांगितले जाते.
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच मनसेचा वर्धापन दिन सोहळा मुंबईबाहेर होत आहे. त्यामुळे राज ठाकरे या मेळाव्यात काय बोलणार, याची उत्सुकता सर्वांना आहे. वर्धापनदिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी मुंबईत राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
मोठी बातमी: मिलिंद एकबोटे राज ठाकरेंच्या भेटीला
दरम्यान, काल भाजप नेते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली. दोघांमधील चर्चेचा तपशील अजून गुलदस्त्यात आहे. मात्र, आगामी नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्ष एकत्र येणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
मनसेचे संभाव्य शॅडो कॅबिनेट
बाळा नांदगावकर- गृहविभाग
नितीन सरदेसाई- वित्त
संदीप देशापांडे-नगरविकास
अमेय खोपकर- सांस्कृतिक विभाग
अभिजीत पानसे- शालेय शिक्षण
गजानन राणे- कामगार विभाग
योगेश परुळेकर- सार्वजनिक बांधकाम
दिलीप धोत्रे- सहकार
राजा चौगुले- अन्न व औषध
संतोष नागरगोजे- कृषी