मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीन मधील तणाव चांगलाच वाढताना दिसत आहे. हा वाढता तणाव पाहता भारतात अनेक चिनी वस्तूंवर बहिष्कार देखील टाकण्यात येत आहे. अशात चिनी कंपन्यांची कंत्राटे तातडीने रद्द करण्याची मागणी मनसेने जेएनपीटीकडे पत्रा द्वारे केली आहे. जे.एन.पी.टी न्हावा-शेवा येथील ए. पी. एम. जी. टी. आय. टर्मिनलवरील कार्गो क्षेत्रात भारतीय कंपन्यांना काढून चीनी कंपन्याना दिलेली कंत्राटे तातडीने रद्द करण्याविषयी मनसे नाविक सेना उपाध्यक्ष संदेश ठाकूर यांनी जे एन पी टीला पत्र पाठवले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पत्रात ते म्हणाले की, 'देशाच्या पंतप्रधानांनी देखील चीनला धडा शिकवण्यासाठी चीनी कंपन्यांना दिलेली कंत्राटे रद्द करण्याचा सपाटा लावला आहे. तिथेच आपण मात्र खुशाल चीनी कंपन्यांसाठी लाल कारपेट टाकत आहात. मुंबई, न्हावा-शेवा स्थित APMGTI ट्रमिनसच्या कार्गो क्षेत्रात काम करणाऱ्या “कार्गो टेक कलमार” या कंपनीकडे वर्षानुवर्षे असलेले कंत्राट काढून आपण ते ZPMC नामक चीनी कंपनीला दिलेले आहे.'


कंपनीचे  ऑपरेशन १ जुलै पासून सुरू होत आहे.  कार्गो टेक कलमार मध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या ४५ आहे. परंतु या कामगारांचा चिनी कंपनीसोबत काम करण्यासाठी  विरोध आहे. 'जो देश आपल्या देशाला धुळीला मिळवण्याचे स्वप्न बघतो आहे तिथल्या कंपनीसोबतचे हे कंत्राट तातडीने रद्द होणेच देशहिताचे असल्याची भूमिका मनसे नाविक सेना कार्याध्यक्ष निशांत गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.  


दोन सूचना 'या' पत्रा द्वारे करण्यात आल्या आहेत
१) चीनी कंपनीला दिलेले कंत्राट रद्द करून भारतीय कंपनीला द्यावे
२) कार्गो टेक कलमार मधील ४५ लोकांना कामगार कायद्यानुसार APMGTI च्या कार्गो क्षेत्रात कायम करून घ्यावे कारण ते २ वर्षापेक्षा जास्त काळ कंत्राटी पध्दतीने काम करत आहेत.