`मातोश्रीत आता फक्त `खेळण्यातला धनुष्य-बाण` उरलाय`, मनसेची टीका
मनसेने पुन्हा एकदा शिवसेनेवर टीका केली आहे.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याविरोधात भूमिका घेतली आणि राज्यातच नाही तर देशात हा मुद्दा चर्चेत आला. राज ठाकरे यांनी भोंगे काढण्याचा अल्टिमेटम दिल्यानंतर राज्य सरकार हरकतीत आलं आणि मनसेच्या अनेक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली तर काहींना ताब्यात घेण्यात आले.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे यांनी शिवसेनेला आव्हान देण्यास सुरुवात केलीये. दुसरीकडे शिवसेना मनसेच्या मागे भाजपचा हात असल्याचा दावा करतेय. राज्यात भोंग्यावरुन वाद कायम असताना मनसेने पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचलं आहे.
मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी शिवसेनेवर टीका करतांना म्हटलं की, 'अनेक मशिदींचे मौलवी आणि असंख्य मुस्लिम बांधव समजूतदारपणा दाखवत भोंग्यांचा वापर थांबवत आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात आजवर कुणालाही- अगदी युती/आघाडी सरकारलाही जे जमलं नाही, ते 'शिवधनुष्य' राजसाहेब ठाकरे यांनी यशस्वीपणे पेललं! मातोश्रीत आता फक्त 'खेळण्यातला धनुष्य-बाण' उरलाय.'