भाजपसोबत युतीबाबत मनसे नेते नितीन सरदेसाई यांची प्रतिक्रिया
मनसे मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपसोबत जाणार का?
मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक जशी जशी जवळ येतेय तशी याबाबतची उत्सूकता देखील वाढली आहे. गेल्या काही निवडणुका महाविकासआघाडीने एकत्र लढवल्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीबाबत देखील चर्चा सुरु झाल्या आहेत. शिवसेनेने राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केल्यामुळे आगामी काळात देखील एकत्र निवडणूक लढण्याची चर्चा सुरु आहे.
मनसे भाजपसोबत युती करणार का याबाबत मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, 'फडणवीस यांनी एका वेगळ्या प्रश्नावर उत्तर देताना जे वक्तव्य केलेय यामुळे पालिका निवडणुकीसाठी त्यांनी हात पुढे केलाय की नाही हे आत्ताच सांगत येणार नाही. याबाबतचे निर्णय राज ठाकरेच घेत असतात, आज याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.'
'मनसेचा जन्मच मराठीसाठी'
पुढे त्यांनी म्हटलं की, 'मनसेचा जन्मच भूमिपुत्रांसाठी, मराठीसाठी झालाय, यामुळे याबाबत कोणालाही शंका घ्यायचं कारण नाही, अमराठीचा मुद्दा हा गैरसमजातून आलाय, मराठीचा आदर अमराठी लोकांनी करावा, आम्ही काही मुद्दाहून कोणाला मारहाण करत नाहीत. मराठीचा मुद्दा मनसे कधीही डावलणार नाही.'
मनसे आणि भाजपची युती झाली तर राज्याच्या राजकारणात नवी समीकरणं तयार होण्याची शक्यता आहे. जानेवारीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर भाजप-मनसेच्या युतीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली होती. मुंबईच नव्हे तर राज्यात अनेक महापालिकांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. मनसे महापालिका निवडणुकांमध्ये महत्त्वाचा फॅक्टर आहे. त्यामुळे मनसेच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.