`मंत्रालयातील अळूचं फदफदं आवडतं की मिरचीचा ठेचा`
येत्या २३ जानेवारीला मुंबईत मनसेचा मेळावा होत आहे.
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) आगामी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांनी एक ट्विट करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे ट्विट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. या ट्विटच्या माध्यमातून संदीप देशपांडे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात तुलना केल्याचे दिसत आहे. मंत्रालयातील गोड गोड अळूचं फदफदं आवडतं की शेतावरची मिरची ठेचा आणि भाकरी निर्णय तुमचा, असे संदीप देशपांडे या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि मनसे यांच्यात शाब्दिक युद्ध रंगणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
येत्या २३ जानेवारीला मुंबईत मनसेचा मेळावा होत आहे. या मेळाव्यात राज ठाकरे मोठी घोषणा करणार असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात प्रभादेवीच्या इंडिया बुल्स स्काय या हॉटेलमध्ये गुप्त बैठक पार पडली होती. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली होती. त्यामुळे २३ तारखेच्या मेळाव्यात राज ठाकरे नव्या आघाडीची घोषणा करणार का, याची उत्सुकता सर्वांना आहे.
तसेच मनसेच्या झेंड्यातही बदल होणार असल्याची चर्चा आहे. पक्षाकडून छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा असणारे, केशरी किंवा भगवा रंग असलेला ध्वज स्वीकारला जाऊ शकतो. त्यामुळे राज ठाकरे हिंदुत्वाचा नवा मुद्दा उचलून धरतील, असा जाणकारांचा होरा आहे. ही गोष्ट भाजपच्या पथ्यावर पडू शकते. त्यामुळे भविष्यात भाजप आणि मनसे एकत्र येण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.