`जनाची नाही किमान मनाची तरी....` मनसेची मुख्यमंत्र्यांवर टीका
संदीप देशपांडेंच ट्विट चर्चेत
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांचा दौरा सुरू होण्यापूर्वीच अनेकांकडून टीका होत असताना आता मनसेनेदेखील उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. अयोध्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी अयोध्येचा इतिहास लक्षात ठेवा अशा आशयाचं ट्विट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलं आहे.
महाविकास आघाडी सरकारला 100 वर्षे पूर्ण होणार आहेत. या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. यावर संदीप देशपांडेंनी ट्विट केलं आहे. 'लक्षात ठेवा, प्रभू रामचंद्रांनी वडीलांच्या सांगण्यावरून सत्तेला लाथ मारून चौदा वर्ष वनवास भोगला आणि भरताला राज्य दिले .पण भरताने संधीसाधू पणा न करता रामचंद्रांच्या पादुका ठेवून राज्य केले.असा इतिहास असलेल्या अयोध्येला जाताय तेंव्हा जाताना जनाची नाही किमान मनाची तरी….शुभेच्छा' असं ट्विट करत टीका केली आहे.
उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या अगोदर अयोध्या गेले होते. तेव्हा त्यांनी आपल्यासोबत मुठभर अयोध्येची माती आणली होती. यानंतरच निवडणुक जिंकल्यावर पुन्हा अयोध्याचा दौरा केला होता. तेव्हा ते भाजपचे मित्रपक्ष म्हणून दौऱ्यावर गेले होते. पण आता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून हा अयोध्या दौरा करणार आहेत.