`सरकारचं सूडाचं राजकारण, आमचेही दिवस येतील` संदीप देशपांडे यांचा इशारा
मनसे नेते संदीप देशपांडे 16 दिवसांनंतर माध्यमांसमोर, सांगितलं नेमकं काय झालेलं
मुंबई : मनसे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) आज तब्बवल 16 दिवसांनंतर माध्यमांसमोर आले. सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्यानंतर संदीप देशपांडे आज थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भेटीसाठी शिवतिर्थावर दाखल झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत त्या दिवशी नेमकं काय झालं याची माहिती दिली.
आम्ही सरकारविरोधात बोलू नये, आमचं तोंड बंद राहावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, आज तुमचे दिवस आहेत, उद्या आमचे येतील असा इशारा यावेळी संदीप देशपांडे यांनी दिला. सरकार सुडाचं राजकारण करत आहे, रात्री अपरात्री आमच्या कुटुंबियांना पोलिसांनी त्रास दिला, असा आरोप करत संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर टीका केली.
आमच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता, आणि या गुन्ह्यासाठी पोलीस आम्हाला शोधत होते, केवळ दबाव निर्माण करण्यासाठी आमच्यावर गुन्हे दाखल केला जात आहे, पण आमच्या कायद्यावर पूर्ण विश्वास होता आणि आम्हाला न्याय मिळाला असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं.
आमच्या वकिलांनी मीडियातील फूटेज कोर्टात दाखवलं त्यावरुन स्पष्ट झालं की आम्ही कोणताही गुन्हा केलेला नव्हता. महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्का लागल्याचं दाखवल तर मी राजकारण सोडेन, त्या महिला महिला पोलीस कर्मचाऱ्याला सक्तीच्या रजेवर का पाठवलं आहे, असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलंय. केंद्र सरकार सूडाचं राजकारण करतंय असं उद्धव ठाकरे म्हणतात, मग तुन्ही काय करताय, असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला.
मशिदीवरील भोंग्याविरोधात आंदोलन करतात संदीप देशपांडे यांनी मुबई पोलिसांच्या तावडीतून पळ काढला होता. यानंतर ते 16 दिवस भूमिगत होते. गुरुवारी संदीप देशपांडे यांना 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर करण्यात आला.