शिशिर शिंदे मनसेला करणार `जय महाराष्ट्र`?
मनसेने पक्ष वाढीसाठी आणि संघटना बांधणीसाठी लक्ष केंद्रीत करत आहे. याचाच एक भाग म्हणून पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे राज्याच्या दौऱ्यावर आहे. असे असताना मनसेला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना सध्या पक्ष वाढीसाठी आणि संघटना बांधणीसाठी लक्ष केंद्रीत करत आहे. याचाच एक भाग म्हणून पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे राज्याच्या दौऱ्यावर आहे. असे असताना मनसेला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. मनसेचे नेते शिशिर शिंदे हे पक्षाला राम राम करण्याची शक्यता आहे. ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. शोशल मीडियावर याबाबत वृत्त जोरदार व्हायरल होत आहे. दरम्यान, शिवसेनेकडून अधिकृत काहीही सांगण्यात आलेले नाही.
दरम्यान, शिशिर शिंदे यांनी गेल्या आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचे वृत्त आहे. मात्र, शिवसेनेकडून अद्याप दुजारा मिळालेला नाही. राज ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून शिशिर शिंदे यांना मानले जातात. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून नवीन पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्या नेत्यांमध्ये शिशिर शिंदेंचा समावेश होता. मात्र, त्यांना सातत्याने डावले गेल्याने ते नाराज आहेत. कोणताही निर्णय घेताना त्यांना सामावून घेतले जात नाही. त्यामुळे त्यांनी पक्षाचा त्याग करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
शिशिर शिंदे हे मनसेचे आमदार म्हणून निवडूनही आले होते. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. गतवर्षी मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांना डावलण्यात आले. तेव्हापासून शिशिर शिंदे नाराज असल्याचे वृत्त आहे. ते शिवसेनेत जाणार का किंवा नाही या वृत्ताबाबत शिशिर शिंदे, मनसे आणि शिवसेना या पक्षांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, शिशिर शिंदे यांनी गतवर्षी आपल्याला पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त करावे, असे पत्र पाठवून राज ठाकरे यांनी आवाहन केले होते.