घुसखोर बांग्लादेशी-पाकिस्तानी यांच्या विरोधात मनसेचा मोर्चा
मनसेच्या ९ फेब्रुवारीच्या मोर्चाचा मार्ग निश्चित झाला आहे.
मुंबई : मनसेच्या ९ फेब्रुवारीच्या मोर्चाचा मार्ग निश्चित झाला आहे. जिजामाता उद्यान,भायखळा ते आझाद मैदान या मार्गावर मोर्चा निघणार आहे. आज मनसे नेते आणि सरचिटणीस यांच्या बैठकीत मार्ग निश्चित करण्यात आला. या मोर्चासाठी पोलिसांकडून परवानगी मागितली जाणार आहे.
घुसखोर बांग्लादेशी आणि पाकिस्तानी यांच्या विरोधात मनसेचा ९ फेब्रुवारीला मोर्चा निघणार आहे. या मोर्चाच्या जनजागृतीसाठी मनसे महाराष्ट्रात ठिकठिकाणी ध्वज रॅली काढणार आहे. मनसेचा राजमुद्रा असलेला झेंडा घरोघरी मनसैनिक पोहोचवणार आहेत. या ध्वजरॅलीच्या माध्यमातून मुंबईत ९ फेब्रुवारी ला होणाऱ्या मोर्चासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याच करणार आवाहन केले जाणार आहे.
मनसेकडून स्पष्टीकरण
दरम्यान, नागरिकत्व सुधारणा कायद्याला (CAA) आमचा पाठिंबा नाही. प्रसारमाध्यमांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) देण्यात आले आहे. त्यासाठी मनसेच्या अधिवेशनात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणाचा काही भाग ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.
राज ठाकरे यांनी केवळ पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हाकलण्याची भूमिका मांडली होती. मात्र, नागरिकत्व सुधारणा कायद्याला (CAA) त्यांचे समर्थन नाही, असे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले. येत्या ९ तारखेला मनसेकडून पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हाकलवून लावण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढला जात आहे.