मुंबई : राज ठाकरे यांनी दिलेला अल्टीमेटम संपल्यावर मनसे कार्यकर्त्यांनी शहरातील विविध ठिकाणी फेरिवाल्यांविरोधात आंदोलन केले. मनसे कार्यकर्त्यांनी शनिवारी केलेल्या आंदोलनात फेरीवाल्यांच्या सामानाची तोडफोड केली. तसेच रेल्वे स्थानक परिसरातील दुकानाबाहेर ठेवलेल्या सामानाचीही नासधूस केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घाटकोपर येथील मनसे कार्यकर्त्यांनी स्थानक परिसरातील सर्व फेरीवाल्यांचा विक्रीमालाची नासधुस करत रस्त्यावर फेकून दिला. मनसैनिकांनी घाटकोपरच्या एम जी रोड, खोत लेन, श्रद्धानंद रोड वरील फेरीवल्याना हुसकावून लावले. 


वसईतही मनसेच्या आंदोलनाचा फेरीवाल्यांना तडाखा बसला. वसईत रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांना मनसेनं हुसकावून लावलं. यावेळी मनसे पदाधिकारी आणि फेरीवाले यांच्या मध्ये बाचाबाचीदेखील झाली. वसई विरार महापालिका केवळ  दिखाऊपणाची कारवाई करत असून महापालिका  प्रशासनाच या फेरीवाल्यांना एक प्रकारे अभय देत असल्याचा आरोप मनसेनं या वेळी केला.


डोंबिवली इथंही मनसेनं फेरीवाल्यानविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. मात्र, मनसे कार्यकर्त्यांनी पाठ वळल्यानंतर पुन्हा फेरीवाले रेल्वे स्थानक परिसरात दिसू लागलेत. त्यामुळे ही मनसेची स्टंटबाजी होती का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.