मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भोंग्याचा (Bhonga) मुद्दा उपस्थित केल्यानतंर राज्यातील वातावरण तापलं आहे. भोंग्याच्या विषय आल्यापासून आम्हाला धमक्या येत असल्याचा दावा मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgoakar) यांनी केला आहे. आज याचसंदर्भात त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांची भेट घेतली. त्यानंतर बाळा नांदगावर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर बाळा नांदगावकर यांनी माध्यमांना याबाबतची माहिती दिली. तीन चार दिवसांपूर्वी माझ्या कार्यालयात धमकीचं एक पत्र आलं आहे. भोंग्याचा विषय झाल्यापासून धमक्या येत आहेत, त्यापैकीच एक पत्र आलं आहे. यात मला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून राज ठाकरे यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली आहे. जीवे मारण्याची धमकी असल्याने काल राज ठाकरे यांना यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर पोलीस आयुक्त आणि जॉईंट क्राईम कमिशनर यांनाही धमकीच्या पत्राबाबत माहिती दिली असं बाळा नांदगावकर यांनी सांगितली.


पत्र कोणी पाठवलं याबाबत काही माहिती नाही, पण ते पत्र पोस्टाने आलं. या पत्रानंतर गृहमंत्र्यांनी तातडीने पोलीस आयुक्तांशी संपर्क साधत तातडीची पावलं उचलण्याच्या सूचना केल्या आहेत अशी माहिती नांदगावकर यांनी दिली आहे.


राज ठाकरे यांच्या केसालाही धक्का लागला, तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, याची दखल राज्य सरकारने घ्यावी, आम्ही राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबासाठी सिक्युरीटी मागत आहोत, राज्य सरकार याची दखल घेत नाही, निदान केंद्र सरकारने तरी याची दखल घ्यावी अशी मागणी नांदगावकर यांनी केली.


हे पत्र हिंदी भाषेत असून काही उर्दु शब्द वापरण्यात आले असल्याचंही नांदगावर यांनी सांगितलं.