आमचा CAA ला पाठिंबा नाही; मनसेचे स्पष्टीकरण
राज ठाकरे यांनी मंगळवारी त्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत याविषयीची भूमिका स्पष्ट केली.
मुंबई: नागरिकत्व सुधारणा कायद्याला (CAA) आमचा पाठिंबा नाही. प्रसारमाध्यमांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) देण्यात आले आहे. त्यासाठी मनसेच्या अधिवेशनात राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणाचा काही भाग ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी केवळ पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हाकलण्याची भूमिका मांडली होती. मात्र, नागरिकत्व सुधारणा कायद्याला (CAA) त्यांचे समर्थन नाही, असे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
'मनसेचा महाविराट मोर्चा पाहिल्यानंतर सरकार घाबरेल, पुन्हा 'तशी' हिंमत करणार नाही'
येत्या ९ तारखेला मनसेकडून पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हाकलवून लावण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढला जात आहे. हा मोर्चा एकप्रकारे CAA कायद्याचे समर्थन असल्याची चर्चा सुरु झाली होती. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मंगळवारी त्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत याविषयीची भूमिका स्पष्ट केली. तेव्हा राज यांनी पदाधिकाऱ्यांसमोर नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीला आपला पाठिंबा नसल्याचे सांगितले.
घुसखोरांना देशातून हुसकावून लावायचे, ही राज ठाकरे यांची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. या विरोधात जे कोणते सरकार कठोर कारवाई करेल त्याला मनसेचा पाठिंबा असेल, असे राज यांनी म्हटले होते. ज्या भूमिका राष्ट्रहिताच्या आहेत, त्याला राज ठाकरेंचे समर्थन राहील, असेही बाळा नांदगावकर यांनी सांगितले.