मुंबई : केंद्रातल्या मोदी सरकारने आणलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पाठिंबा दिला आहे. पाकिस्तानी आणि बांगलादेशमधून आलेल्या घुसखोर मुस्लिमांना बाहेर काढण्यासाठी मनसे मोर्चा काढणार आहे. मोर्चाला उत्तर हे मोर्चानेच दिलं जाईल, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. येत्या ९ फेब्रुवारीला हा मोर्चा काढण्यात येणार आहे. मनसेचं मुंबईमध्ये आज पहिलं अधिवेशन पार पडलं, या अधिवेशनात राज ठाकरेंनी मनसेची पुढची भूमिका स्पष्ट केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज राज्यात बाहेरच्या देशातून आलेले मौलवी जाऊन देशविघातक कारवाया करत आहेत अशी माझी माहिती आहे आणि ह्या विषयावर मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आणि देशाच्या गृहमंत्र्यांची भेट घेणार आहे, असं राज ठाकरे म्हणाले.


सीएए एनआरसी वर अचानक हजारोंचे मोर्चे निघायला लागले आणि हे मोर्चे का निघत आहेत तर कलम ३७० असो व राममंदिराचा सुप्रीम कोर्टाचा निकाल असो त्यावरचा राग रस्त्यावर मोर्चे काढून निघत आहे, असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे.


नागरिकत्व सुधारणा विधेयकाबरोबरच केंद्र सरकारने समझौता एक्स्प्रेसही बंद करावी. आज देशात उभे राहिलेले मोहल्ले देशाला त्रास देतील. उद्या जर युद्ध झालं तर सैन्याला बाहेरच्या नाही तर आतल्या शत्रूंशी लढावं लागेल, अशी भीती राज ठाकरेंनी व्यक्त केली.


धर्म तुमच्या घरात आचरणात आणा. मशिदींवरचे भोंगे हवेत कशाला? आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का? तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही, असं राज ठाकरेंनी सांगितलं.


मी मराठी आणि हिंदू आहे. मराठीला नख लावण्याचा प्रयत्न केला तर मराठी म्हणून अंगावर जाईन आणि हिंदू म्हणून नख लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन, असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. रंग बदलून सरकारमध्ये जाणारा राज ठाकरे नाही, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला.