`पद्मावती`वर मनसेची भूमिका काय?
संजय लीला भन्साळींच्या पद्मावती या चित्रपटावरून सध्या देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये वाद सुरु आहेत.
दिनेश दुखंडे, प्रतिनिधी, झी मीडिया मुंबई : संजय लीला भन्साळींच्या पद्मावती या चित्रपटावरून सध्या देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये वाद सुरु आहेत. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी काही संघटनांनी केली आहे. महाराष्ट्रातही पद्मावती चित्रपटाविरोधात कोल्हापुरात निदर्शनं करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी पद्मावतीच्या प्रदर्शनाला परवानगी देऊ नये अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
पद्मावतीच्या या वादात आता मनसेनंही उडी घेतली आहे. चित्रपट पाहिल्याशिवाय राजपूत समाजानं विरोध करू नये, असं वक्तव्य मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केलं आहे. भाजपचे काही आमदार चित्रपट प्रदर्शनाला विरोध करत आहेत पण त्यांचं सरकार आहे. हिंमत असेल तर त्यांनी चित्रपटावर बंदी आणावी असा टोलाही खोपकर यांनी लगावलाय. पद्मावती हा चित्रपट मनसे प्रदर्शनाआधी पाहणार आहे. यामध्ये काही आक्षेपार्ह आढळलं तर विरोध केला जाईल, असं अमेय खोपकर यांनी स्पष्ट केलं आहे.
'न्यूड' 'येस दुर्गा'ला मिळालेली वागणूक निषेधार्ह
न्यूड आणि येस दुर्गा या चित्रपटांना गोवा फिल्म फेस्टिव्हलमध्ये मिळालेली वागणूक निषेधार्ह आहे. केंद्रीय प्रसारण विभागाचा निषेध करण्यासाठी अनेक कलावंत आणि मी गोवा फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार नाही, असं अमेय खोपकर म्हणाले.