मुंबई : मनसेच्या नव्या झेंड्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने मनसेला नोटीस बजावली आहे. पक्षाच्या झेंड्यावर महाराजांच्या राजमुद्रेचा वापर केल्याप्रकरणी राज्य निवडणूक आयोगाने मनसेला नोटीस बजावली आहे. संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ, जय हो फाऊंडेशन यांनी ही तक्रार केली होती. थोर व्यक्ती आणि चिन्हांचा गैरवापर केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या निवडणूक आयोगाच्या नोटीसला मनसेने  प्रत्युत्तर दिलं आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या नोटीसविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाचा झेंडा कुठला असावा याच्याशी राज्य निवडणूक आयोगाचा संबंध नाही. त्यामुळे आम्ही राज्य निवडणूक आयोगाला उत्तर देण्यास बांधील नाही, असा पवित्रा संदीप देशपांडे यांनी घेतला आहे.


पक्षाच्या झेंड्यावर शिवकालीन राजमुद्रेचा वापर केल्याप्रकरणी बुधवारी निवडणूक आयोगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) नोटीस बजावली. मनसेच्या नुकत्याच पार पडलेल्या राज्यव्यापी अधिवेशनात पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण करण्यात आले होते. हा झेंडा भगव्या रंगाचा असून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेची प्रतिमा आहे. (राजमुद्रेचा वापर भोवणार? मनसेला निवडणूक आयोगाची नोटीस) 


त्यामुळे संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ आणि जय हो फाऊंडेशनने मनसेच्या या नव्या झेंड्याला विरोध दर्शविला होता. शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी राजमुद्रेची निर्मिती केली. त्या राजमुद्रेचा वापर कुठल्याही पक्षांनी राजकारण करण्यासाठी करू नये, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने मांडली होती. 



याविरोधात संभाजी ब्रिगेडने राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने मनसेला योग्य ती कार्यवाही करण्याची नोटीस बजावली आहे.