मनसेच्या शॅडो कॅबिनेटची ९ मार्चला घोषणा
मनसेच्या शॅडो कॅबिनेटचा मुहूर्त ठरला
देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : मनसेच्या शॅडो कॅबिनेटची ९ मार्चला घोषणा होणार आहे. ९ मार्चला मनसेचा १४वा वर्धापन दिन आहे. नवी मुंबईच्या विष्णुदास भावे सभागृहात मनसेचा वर्धापन दिन साजरा होईल. याच कार्यक्रमात मनसेच्या शॅडो कॅबिनेटची घोषणा होईल.
मनसेच्या पहिल्याच राज्यव्यापी अधिवेशनात शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्यात आली होती. महाविकासआघाडीच्या मंत्र्यांच्या कारभारावर मनसे शॅडो कॅबिनेटमंत्री लक्ष ठेवणार आहेत. मनसे नेते, सरचिटणीस आणि प्रमुख पदाधिकारी या शॅडो कॅबिनेटमध्ये असणार आहेत.
मनसेचा वर्धापन दिन पहिल्यांदाच मुंबईच्या बाहेर होत आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीवर लक्ष ठेवून हा कार्यक्रम वाशीमध्ये होत असल्याचं बोललं जात आहे.
पहिल्याच राज्यव्यापी अधिवेशनात मनसेने कात टाकली. या अधिवेशनात राज ठाकरेंनी पक्षाचा झेंडा बदलला. भगवा रंग शिवमुद्रा असलेला झेंडा मनसेच्या कार्यक्रमात तसंच भगवा रंग आणि रेल्वे इंजिन ही निशाणी असलेला झेंडा निवडणुकीवेळी वापरणार असल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या अधिवेशनात केली.
राज्यव्यापी अधिवेशनामध्येच सीएए आणि एनआरसीला पाठिंबा देण्यासाठी मोर्चा काढणार असल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केलं. यानंतर राज ठाकरेंच्या नेतृत्वात मनसेने मुंबईत मोर्चाही काढला. आता वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे पुढे काय भूमिका घेतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.