मुंबई : राज्यात राजकीय भूकंप झाल्यानंतर आता अस्तित्वासाठी संघर्ष सुरु आहे. एकनाथ शिंदे (CM Eknath SHinde) यांनी महाविकासआघाडी सरकारमधून बाहेर पडल्यानंतर भाजपसोबत (BJP) सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करत भाजपने मास्टरस्ट्रोक खेळला आणि उद्धव ठाकरे यांच्यापुढचं आव्हान वाढलं. नंतर शिवसेनेवर शिंदे गटाने दावा ठोकला आणि उद्धव ठाकरे यांचा बैठकांचा सपाटा सुरु झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर चालत असून आम्हीच शिवसेना (Shivsena) असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. त्यानंतर शिवसेनेत आता 2 गट पडले आहेत. 40 आमदारांसह एकनाथ शिंदे यांच्याकडे मोठी ताकद असल्याने आता उद्धव ठाकरे यांचं आव्हान वाढलं आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना शह देण्यासाठी भाजपकडून ही प्रयत्न सुरु झाले आहेत.


शिवसेना काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी (NCP) सोबत सत्तेत बसल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला. त्यानंतर भाजप आणि मनसेची जवळीक वाढण्याची शक्यता वाढली आहे. दुसरीकडे आता भाजप नेते आणि राज ठाकरे यांच्यातील भेटीगाठी वाढत आहे. 


कालच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली होती. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी ही राज ठाकरे यांची भेट घेतली. विनोद तावडे देखील राज ठाकरे यांच्या घरी त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते.


भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी भाजप-मनसे युतीचे संकेत दिले आहेत. भाजप आणि मनसे (BJP-MNS) हिंदुत्वाच्या विचाराचे असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 


दुसरीकडे राज ठाकरे हे देखील दसरा मेळावा घेणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी मनसे शिवसेनेला पर्याय देण्याचा प्रयत्न करेल. त्याची सुरुवात दसरा मेळाव्यापासून होऊ शकते. 


राज ठाकरे हे देखील आता अॅक्टीव्ह झाले आहेत. पदाधिकाऱ्यांची भेटीगाठी आणि कार्यकर्त्यांसोबत चर्चा करत आहेत. 


दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाला अजूनही दसरा मेळाव्याची परवानगी मिळालेली नाही. शिंदे गट देखील दसरा मेळाव्या घेण्याबाबत चाचपणी करत आहे. त्यामुळे आता हा राजकीय स्पर्धा आणखी वाढणार आहे.