अनेकांचा विरोध पण, मनसेचा `पद्मावत`ला पाठिंबा; संरक्षणही देणार!
सध्या देशात अत्यंत वादग्रस्त ठरलेला विषय कोणता असेल तर, तो `पद्मावत`. अनेक राजकीय पक्षही या विषयार सूचक मैन बाळगून आहेत. मात्र, राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नव निर्माण सेना (मनसे) मात्र, `पद्मावत`च्या पाठीशी उभा राहिला आहे.
मुंबई: सध्या देशात अत्यंत वादग्रस्त ठरलेला विषय कोणता असेल तर, तो 'पद्मावत'. चित्रपटाच्या आषयावर आक्षेप घेत करणी सेनेने देशभर विरोध कायम ठेवलाय. तोही चित्रपटाला सेन्सॉरची मान्यता असताना. अनेक राजकीय पक्षही या विषयार सूचक मैन बाळगून आहेत. मात्र, राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नव निर्माण सेना (मनसे) मात्र, 'पद्मावत'च्या पाठीशी उभा राहिला आहे.
'पद्मावत'च्या विरोधास ठाम विरोध
मनसेच्या सरचिटणीस व महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्षा (working president) शालिनी ठाकरे यांनीच याबाबत स्पष्ट मत व्यक्त केले आहे. दुसरे असे की, मनेसेने 'पद्मावत'ला संरक्षणही देऊ केले आहे. यापूर्वी आम्हीही अनेक चित्रपटांना विरोध केला. मात्र, हा विरोध मुद्द्यांवर होता. चित्रपटाच्या आषयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आम्ही एकाही चित्रपटाला विरोध केला नाही, असे ठणकावून सांगतानाच 'पद्मावत'ला होत असलेल्या विरोधाला मनसेने ठाम विरोध केला आहे.
विरोधासाठी भारत बंदची हाक चुकीची
'पद्मावत'ला सेन्सॉर बोर्डाने मान्यता दिली आहे. सुप्रीम कोर्टानेही 'पद्मावत'ला परवानगीरूपी दिलासा दिलेला आहे. असे असताना चित्रपटाला विरोध करण चुक आहे. तसेच, चित्रपटाला विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक देणं हे तर, त्याहून चूक असल्याचे शालिनी ठाकरे यांनी म्हटले आहे. 'पद्मावत' महाराष्ट्रात प्रदर्शित व्हावा असेही शालिनी ठाकरे यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांच्या राज्यात सुरक्षा धोक्यात
'पद्मावत'संबंधाने पुढे बोलताना, 'नुकसान होईल या भीतीने मल्टीप्लेक्सच्या अनेक मालकांनी चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वत: पंतप्रधान ज्या राज्यातून येतात त्या राज्यातही 'पद्मावत' प्रदर्शित न होण्याची चिन्हे आहेत. स्वत: पंतप्रधानांच्या राज्यात अशी स्थिती असेल तर, इतर राज्यांमध्ये कायदा-सुव्यवस्थेची किती वाईट स्थिती असेल याची कल्पनाच न केलेली बरी', अशी टीकाही शालिनी ठाकरे यांनी केली आहे.
मनसे देणार 'पद्मावत'ला संरक्षण
दरम्यान, सिनेमाच्या दिग्दर्शक-कलावंतांच्या संरक्षणासाठी मनसे कटीबद्ध आहे. मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जर पद्मावत प्रदर्शिक होण्यापासून रोखण्याचा कुणी प्रयत्न केला, तर मनसे दिग्दर्शक, कलावंतांचे संरक्षण करेन असेही शालिनी ठाकरे यांनी म्हटले आहे.