करून दाखवलं... निर्बंध झुगारत मनसे कार्यकर्त्यांचा रेल्वेने प्रवास
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ डॉक्टर्स आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा आहे.
मुंबई: सर्वसामान्य लोकांसाठी रेल्वे सेवा सुरु व्हावी, यासाठी सोमवारी मुंबईत मनसेकडून सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आले. त्यानुसार मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि पक्षाच्या इतर कार्यकर्त्यांनी निर्बंध झुगारत लोकल ट्रेनने प्रवास केला. मनसेकडून यापूर्वीच सविनय कायदेभंग आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. यानंतर रेल्वे पोलिसांकडून संदीप देशपांडे यांना आंदोलन न करण्यासंदर्भात नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र, तरीही संदीप देशपांडे आणि मनसे कार्यकर्त्यांनी रेल्वेने प्रवास केला. त्यामुळे आता रेल्वे पोलिसांकडून त्यांच्यावर काय कारवाई केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ डॉक्टर्स आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा आहे. त्यामुळे सामान्य लोकांना आपले कार्यालय गाठण्यासाठी रस्ते वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, त्यामुळे रस्ते वाहतुकीवर प्रचंड ताण येत असून सामान्य नोकरदारांचे प्रचंड हाल होत आहे.
या पार्श्वभूमीवर मनसेकडून सविनय कायदेभंग आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.आठ तास ड्युटी आणि आठ तास प्रवास असे का ? लोकल सुरू करा, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली होती. एसटी आणि बस वाहतूक सुरु असताना कोरोना पसरत नसेल तर रेल्वे प्रवासातूनच कोरोना कसा काय पसरु शकतो, असा सवाल मनसेकडून उपस्थित करण्यात आला होता. कोरोनाने अनिल परब यांच्या कानात सांगितलं आहे का की, एसटी सुरु झाल्यास कोरोना होणार नाही आणि रेल्वे सुरु झाल्यास होणार, अशी खोचक टिप्पणीही संदीप देशपांडे यांच्याकडून करण्यात आली होती.