अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई : मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये चाकरमान्यांच्या खिशात हात घालून त्यांचे मोबाईल चोरले जातायत. लोकल ट्रेनमधील मोबाईल चोरीच्या या घटनांनी २०१७ या वर्षभरात मोबाईल चोरीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केलेत. 


रेल्वेनं प्रवास करताय... सावधान!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दर दिवशी मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या किमान ५० रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरले जात आहेत. त्यामुळे ही लाईफलाईन आता प्रवाशांचा खिशाला कात्री लावणारी लाईन ठरतेय. रेल्वे पोलीस मात्र या मोबाईल चोरीच्या वाढलेल्या घटना विशेष नसल्याचं सांगत आहेत. 


मुंबईकरांना रोज त्यांच्या कामावर नेणारी आणि परत घरी आणणारी लोकल सेवा म्हणजे त्यांच्यासाठी जीवन वाहिनीच... सर्वांत स्वस्त, सुरक्षित आणि म्हटलं तर वेळेत प्रवास घडवून आणणारी ही सेवा... मात्र आता या लोकलने प्रवास करताना तुमचा मोबाईल जपून ठेवा. कारण रोज किमान ५० प्रवाशांचे मोबाईल फोन चोरीला जात आहेत. मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये तब्बल नऊ पटींनी वाढ झालीय. 


काय सांगतेय आकडेवारी... 


- २०१५ मध्ये २,०९४ रेल्वे प्रवाशांचे फोन चोरीला गेले. यापैंकी १,२१४ घटना उघड झाल्या. यात १,३१६ जणांना अटक केली 


- २०१६ मध्ये २,००९ रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरीला गेले. यापैंकी १,२४३ घटना उघड झाल्या. १,३५७ आरोपींना अटक करण्यात आली


- तर, २०१७ मध्ये नोव्हेंबरपर्यंतच तब्बल १७,६४८ प्रवाशांचे मोबाईल चोरीला गेले. यात २०७८ घटना उघड झाल्या. त्यात २,३२८ आरोपींना अटक करण्यात आली. 


मात्र, रेल्वे पोलीस हे मानायला तयार नाहीत. मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया बदलल्याने ही आकडेवारी वाढल्याचं दिसतंय असं रेल्वे पोलिसांचं म्हणणं आहे. 


सध्या मोबाईल ही गरज झाल्यामुळे अनेकांच्या खिशात महागडे फोन असतात. त्यामुळे मोबाईल चोऱ्याही वाढल्या आहेत. मोबाईल चोऱ्या फारशा उघडही होत नाहीत. कारण मोबाईल चोऱ्यावर लगेच त्याची विल्हेवाट लावली जाते.