लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत अनेक भाविकांचे मोबाईल लंपास
लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत चोरांची चांदी
मुंबई : भक्तगणांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या लालबागच्या मंडपात यावर्षी गणेशोत्सवादरम्यान शेकडो भक्तांचे मोबाईल लंपास झाले आहेत. गणेशोत्सवानंतर तक्रारी येऊ लागल्याने चोरीच्या या घटना पुढे येऊ लागल्या आहेत. दरवर्षी लालबागच्या राजाच्या मिरवणूकीत मोठ्या प्रमाणावर चोऱ्या होतात. यंदाच वर्ष देखील त्याला अपवाद ठरलेलं नाही. यावेळी विसर्जन मिरवणुकीत तब्बल १६२ भक्तांचे मोबाईल लंपास करण्यात आले आहेत.
पोलीस स्थानकात अनेक तक्रारी
काळाचौकी पोलीस स्थानकात याबाबतच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे यंदा दर्शनाच्या दहा दिवसात तब्बल दीडशे भक्तांचे मोबाईल चोरी झाले आहेत. याशिवाय सोनसाखळ्या आणि पाकीट मारल्याच्या घटनांची संख्या मोठी आहे.
दागिने आणि मोबाईलवर चोरांचा डल्ला
लालबागमध्ये विसर्जन मिरवणूकादरम्यान देखील भाविकांचा अनेक वस्तू चोरीला गेल्या आहेत. चोरट्यांनी भाविकांचे पाकिट, सोन्याचे दागिने आणि मोबाईलवर डल्ला मारला आहे. गर्दीचा फायदा घेत चोरटयांनी हात साफ केले आहेत. लालबागमध्ये भाविकांची मोठी गर्दी होते याचाच फायदा चोर उचलतात.