दाऊदचा पुतण्या मोहम्मद रिझवान कासकरवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल
खंडणीप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती.
मुंबई : मुंबई पोलिसांनी अटक केलेला दाऊदचा पुतण्य़ा मोहम्मद रिझवान कासकरवर मुंबई पोलिसांनी मकोका अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे. रिझवानसह अशफाक टायरवाला, अहमद यांच्यावरही मकोका दाखल झाला आहे. खंडणीप्रकरणात मोहम्मद रिझवानला अटक झाली आहे. रिझवान आणि त्याच्या साथीदारांवर मुंबई आणि सूरत भागात पाच गुन्हे दाखल आहेत.
याआधी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा पुतण्या रिझवान कासकरच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. दाऊद पाकिस्तानमध्येच लपून बसल्याचं रिजवाननं म्हटलं होतं. पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआयच्या अधिकाऱ्यांशी दाऊदचे चांगले संबंध असल्याचा खुलासाही रिझवाननं केला होता. दाऊदला पाकिस्तानी सैन्य, आयएसआय आणि खासगी कमांडो एकत्रितपणे सुरक्षा पुरवत असल्याची माहितीही त्यानं दिली होती.
जैश-ए-मोहम्मद, हिज्बुल मुजाहिदीन आणि लष्कर-ए-तोयबाचे प्रमुख दाऊदच्या संपर्कात आहेत. अशी माहितीदेखील रिझवानने चौकशीदरम्यान दिली आहे. एका खंडणी प्रकरणात दाऊदचा पुतण्या रिझवानला मुंबई गुन्हे शाखेनं नुकतीच अटक केली होती.
देश सोडण्याच्या प्रयत्नात असताना मुंबई पोलिसांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. रिझवान कासकर हा दाऊदचा भाऊ इकबाल कासकरचा मुलगा आहे.