मोदी साहेब बोलू नका हिंमत दाखवा: शिवसेना
पाकड्यांच्या हद्दीत सैन्य घुसवून आपला हस्तक्षेप सुरू करा. मोदी यांच्याकडून देशाला कृतीची अपेक्षा आहे, कृती करा, अशा थेट शब्दात...
मुंबई : गुजरात निवडणुकीत पाकिस्तानचा हात असल्याचे काय सांगता? नुसते बोलून नका हिंमत दाखवा. पाकड्यांच्या हद्दीत सैन्य घुसवून आपला हस्तक्षेप सुरू करा. मोदी यांच्याकडून देशाला कृतीची अपेक्षा आहे, कृती करा, अशा थेट शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
पाकड्यांची जपमाळ किती ओढाल?
शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दै. सामनामध्ये ठाकरे यांनी एक लेख लिहीला आहे. या लेखात गुजरात निवडणूक, प्रचारादरम्यान मोदींनी केलेली भाषणे, त्यातील मुद्दे आणि पाकिस्तान अशा अनेक मुद्द्यांवर कटाक्ष टाकला आहे. ठाकरे यांनी थेट मोदींवरच टीका केली आहे. गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत पाकड्यांचा हात व जीभ वळवळत असेल तर फक्त प्रचार सभांतून आरोपांचा धुरळा न उडवता पंतप्रधानांनी या वळवळणाऱ्या जिभा व हात कलम करण्याची हिंमत दाखवायला हवी, असे मत व्यक्त करत पाकड्यांची जपमाळ किती ओढाल?, असा सवालही ठाकरे यांनी विचारला आहे.
पायाखालची वाळू सरकली की पाकिस्तान व दाऊदची जपमाळ ओढायची
पायाखालची वाळू सरकली की पाकिस्तान व दाऊदची जपमाळ ओढायची असाच प्रकार सध्या सुरू आहे. हा एकप्रकारे ‘नापाक’पणाच आहे. मागे बिहार निवडणुकीच्या प्रचारातही भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी पाकिस्तानला घुसवलेच होते. बिहारात नितीशकुमारांचा विजय झाला तर पाकिस्तानात फटाकेच फटाके फुटतील, अशी भविष्यवाणी श्री. शहा यांनी करूनही तेथे भाजपचा दारुण पराभव व नितीशकुमारांचा विजय झाला. त्याच नितीशकुमारांबरोबर आता भाजप सत्तेत सहभागी झाला. त्यामुळे पाकिस्तानात फटके फुटले की भूकंप झाला हे कळायला मार्ग नाही, पण गुजरात निवडणुकीत पाकिस्तानछाप भिजलेल्या फटाक्यांचा धूर मात्र निघत आहे, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला आहे.
मोदींची गुप्तचर यंत्रणा सतर्क नाही
डॉ. मनमोहन सिंग यांच्या राष्ट्रभक्तीविषयी मोदी यांच्या मनात शंका निर्माण झाली असेल तर त्यांनी बेशकपणे तसे बोलायला हवे. मनमोहन हे ‘मौनीबाबा’ आहेत असा आरोप मोदी व त्यांचे भक्त करीत होते. या मौनीबाबांनी मोदी किंवा देशविरोधी कारवायांत भाग घेतला व त्यानंतर गुजरात निवडणुकीत पाकचा हस्तक्षेप सुरू झाला, असे मोदी यांना वाटते. मोदी यांनी आरोप केले, पण सरकारकडे प्रचंड ताकदीची गुप्तचर यंत्रणा असते. तरीही पाकसोबतच्या बैठकीचे वृत्त पंतप्रधानांना मीडियातून कळले. तेव्हा हीसुद्धा बाब तितकीच गंभीर आहे.