VIDEO : डान्स-गाण्यात निरुपम धुंद, भाजप नेत्यानं शेअर केला व्हिडिओ
१ जानेवारी रोजी सकाळी संजय निरुपम यांनी सिद्धिविनायक मंदिरातील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता
मुंबई : मुंबई भाजपचे उपाध्यक्ष मोहित कंबोज यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय. हा व्हिडिओ आहे काँग्रेस नेते संजय निरुपम यांचा... संजय निरुपम यांचे दोन चेहरे समाजासमोर आणण्यासाठी कंबोज यांनी हा व्हिडिओ शेअर केल्याचं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. नव्या वर्षाच्या निमित्तानं संजय निरुपम यांनी जनतेसमोर आपलं वेगळं रुप दाखवलं... आपली चांगली इमेज लोकांसमोर ठसवण्यासाठी त्यांनी सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतानाचा एक फोटो शेअर केला... मात्र, संजय निरुपम ३१ डिसेंबर रोजी रात्री हॉटेलमध्ये जोरदार डान्स, गाण्यात आणि मजा-मस्तीत मश्गूल होते, असाही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये उल्लेख केलाय.
'संजय निरुपम के दो चेहरे... जनता को दिखाने का चेहरा अलग और असली चेहरा अलग... जनता को बताया कि नववर्ष की शुरुआत मंदिर में दर्शन करके की, जबकि नववर्ष की पूरी रात मयखाने में गुज़री। यह वीडियो देखिए...' असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
कंबोज यांनी हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर मात्र संजय निरुपम चांगलेच भडकलेत. 'हो मी माझ्या कुटुंबीयांसोबत आणि मित्रांसोबत नवं वर्ष साजरं केलं... भाजप शासन काळात हा गुन्हा असेल तर सरकारनं माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा' असं जोरदार प्रत्यूत्तर त्यांनी कंबोज यांना दिलंय.
१ जानेवारी रोजी सकाळी संजय निरुपम यांनी सिद्धिविनायक मंदिरातील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. आपण नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसाची सुरूवात बाप्पाचं दर्शन घेऊन केल्याचं सोशल मीडियावर त्यांनी म्हटलं होतं.