मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे दोघेही सध्या आर्थर रोड कारागृहात (Arthur Road Jail) न्यायालयीन कोठडीत  (Judicial Custody) आहेत. या दोघांच्याही जेल ते कोर्ट आणि कोर्ट ते जेल अशा वाऱ्या सध्या सुरू आहेत. मनी लाँडरिंग (Money Laundering) प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दोघांनाही ईडीने (Enforcement Directorate) अटक केलेली आहे. विशेष पीएमएलए कोर्ट (PMLA Court) हे मुंबई सत्र न्यायालयात (Mumbai Session Court) असून  संजय राऊत आणि अनिल देशमुख हे न्यायालयीन कोठडी संपल्यावर आणि जामीन अर्जावरील सुनावणीस याच कोर्टात हजर होत असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यायालयात राऊत आणि देशमुख यांची नक्की कशी भेट झाली ?
आज संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होती. म्हणून जेल प्रशासनाने संजय राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयात आणले होते.  तर अनिल देशमुख यांची न्यायालयीन कोठडी संपत असल्याने त्यांनाही जेल प्रशासनाने मुंबई सत्र न्यायालयात आणलं होतं. जेलमध्ये शेजारी असूनही भेटू न शकणारे संजय राऊत आणि अनिल देशमुख यांची मात्र न्यायालयात योगायोगाने भेट झाली. 


जामीन अर्जावरील सुनावणी संपल्यावर संजय राऊत यांना कोर्ट नंबर 16 मधून बाहेर काढण्यात आले. ते कोर्टच्या बाहेर पडण्यासाठी लिफ्ट जवळ जाणार तोच लिफ्टच्या जवळ असलेल्या कोर्ट नंबर 54 बाहेर अनिल देशमुख बसलेले त्यांना दिसले. अनिल देशमुख हे मागे चक्कर येऊन पडल्याने त्यांच्या हाताचे हाड मोडले असून त्यांचा हात गळ्यात अडकवलेला आहे. संजय राऊत यांनी अनिल देशमुख यांच्या जवळ जाऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. दोन मिनिटं दोघांमध्ये संभाषण झालं आणि मग संजय राऊत निघाले.