विधीमंडळांचं पावसाळी अधिवेशन यंदा नागपूरला होणार
विधीमंडळांचं पावसाळी अधिवेशन यंदा नागपूरला होणार आहे. आज अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताना याबाबत औपचारिक घोषणा करण्यात येईल.
मुंबई : विधीमंडळांचं पावसाळी अधिवेशन यंदा नागपूरला होणार आहे. आज अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताना याबाबत औपचारिक घोषणा करण्यात येईल. विदर्भाचे प्रश्न मार्गी लावावेत यासाठी जास्त वेळ चालणारे अधिवेशन राज्याची उपराजधानी नागपूर इथे घ्यावे अशी मागणी गेल्या हिवाळी अधिवेशनात करण्यात आली होती. मुंबईत मनोरा आमदार निवासची इमारत तोडण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आमदारांची राहण्याची गैरसोयही होणार आहे. त्यामुळेच 3 आठवड्याचे पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणार असल्याची घोषणा आज केली जाणार आहे.
जुलैमध्ये हिवाळी अधिवेशन
जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून हे अधिवेशन सुरू होईल. तसंच परंपरेने हिवाळी अधिवेशनही नागपूरमध्ये घेतले जाणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आज शेवटचा दिवस आहे. विधीमंडळच्या दोन्ही सभागृहात भरगच्च कामकाज ठेवण्यात आले आहे. असं असलं तरी अधिवेशनाची समाप्ती होतांना पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होण्याबाबत काय घोषणा केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
आज शेवटचा दिवस
विधानसभेत टेंभुर्णी - कुर्डुवाडी - बार्शी - लातूर रस्त्याचा प्रश्न, बुलढाणा शहरातील विकास कामांचा प्रश्न अशा प्रमुख प्रश्नांवर लक्षवेधी प्रश्न विचारण्यात आले आहेत. तर राज्यातील सिंचन प्रकल्प, उद्योग विभागाच्या समस्यांवरच्या चर्चेवर सरकारतर्फे उत्तर दिलं जाणार आहे. राज्यातील शेतकरी समस्या आणि भ्रष्टाचार यांवर अंतिम आठवडा प्रस्ताव विरोधी पक्ष मांडणार आहे.
तर विधानपरिषदमध्ये शैक्षणिक धोरण चर्चेबाबत शिक्षणमंत्री उत्तर देणार आहेत. कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटी प्रकल्प, राज्यातील मागासवर्गीय कर्मचारी पदोन्नती आरक्षणचा मुद्दा, मुंबईतील नद्यांचे रुंदीकरण, यवतमाळ शहरासाठीचा बेंबळा प्रकल्प अशा विविध प्रश्नांवर लक्षवेधी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. कृषी आणि पणन विभागावर विरोधी पक्षाच्या अंतिम आठवडा प्रस्तावाववर मंत्री काय उत्तर देतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसंच धनगर आरक्षणचा मुद्दा अल्पकालीन चर्चेद्वारे उपस्थित करण्यात आला आहे.