कोकणकन्या, मांडवी एक्स्प्रेसचा अधिक आरामदायी प्रवास
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव धावणाऱ्या कोकणकन्या आणि मांडवी एक्सप्रेसचा प्रवास आणखी आरामदायी होणार आहे.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव धावणाऱ्या कोकणकन्या आणि मांडवी एक्सप्रेसला एलएचबी कोच बसविण्यात येणार आहे. १० जून ते ३१ ऑगस्टपर्यंत या नव्या एलएचबी डब्ब्यांसह या एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. यामुळे प्रवासी सुरक्षेत वाढ आणि प्रवाशांना आणखी आरामदायी प्रवास मिळणे शक्य होणार आहे.
१०१११ आणि १०११२ मुंबई ते मडगाव कोकणकन्या एक्सप्रेस आणि १०१०३/१०१०४ मुंबई ते मडगाव मांडवी एक्स्प्रेस २२ डब्यायची असून सुरुवातीला १० जून ते ३१
ऑगस्टपर्यंत या नव्या एलएचबी डब्ब्यासह चालविण्यात येणार आहे. यामध्ये अत्याधुनिक शौचालये, आरामदायक आसन उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. त्यानंतर १ सप्टेंबरपासून कायमस्वरूपी एलएचबी डब्ब्यासह धावणार आहे. एलएचबी कोचमध्ये प्रवासी क्षमता वाढणार आहे.
एलएचबी डब्ब्यासह शयनयान (स्लीपर कोच) ७२ ऐवजी ८० प्रवासी झोपू शकतात. एसी ३ टायर (बी १ ते बी ५) मध्ये ६४ ऐवजी ७२ प्रवासी, एसी २ टायरमध्ये ५४ आणि एचए १ मध्ये २४ प्रवासी क्षमता आहे. यामुळे कोकणकन्या एक्सप्रेसमध्ये एकूण १२४ प्रवासी क्षमता आणि मांडवी एक्सप्रेसमध्ये ९४ प्रवासी क्षमता वाढली आहे. स्लीपर कोचमध्ये लोअर बर्थची रूंदी वाढण्याने ज्येष्ठ नागरिकांना झोपण्यास जादा जागा मिळणार आहे.