मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याचा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील लहान मुलांचे रक्त नमुने विषयक सर्वेक्षण (Serological surveys) केलं. यात 50 टक्क्यांपेक्षा जास्त मुलांमध्ये अँटीबॉडीज विकसीत झाल्याचं आढळलं आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच्या सर्वेक्षणाच्या तुलनेत अँटीबॉडीज (antibodies) असलेल्या लहान मुलांची संख्या जास्त आढळली असून ही बाब समाधानकारक मानली जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलांचे रक्त नमुने विषयक सर्वेक्षण करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिले होते. यानुसार 1 एप्रिल ते 15 जून 2021 दरम्यान मुलांचे सेरोलॉजिकल सर्वेक्षण करण्यात आलं. मुंबईतील सर्व 24 विभागातील 2 हजार 176 रक्त नमुने तपासण्यात आले. संकलित रक्त नमुन्यांच्या चाचणीत प्राप्त झालेले निकष याप्रमाण आहेत.


- मुंबईतील 51.78 टक्के मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळले आहेत. 


- वयवर्ष 10 ते 14 वयोगटामध्ये सर्वाधिक म्हणजे 53.43 टक्के मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळून आले आहेत.


- वयवर्ष 1 ते 4 वयोगटामध्ये 51.04 टक्के, 5 ते 9 वयोगटामध्ये 47.33 टक्के, 10 ते 14 वयोगटामध्ये 53.43 टक्के, तर 15 ते 18 वयोगटामध्ये 51.39 टक्के अँटीबॉडीज आढळून आले आहेत.


लहान मुलांमध्ये कोविड-19 संसर्गाची बाधा कमी करता यावी, यासाठी लहान मुलांना नजरेसमोर ठेऊन आरोग्य शिक्षण देणं, कोविड-19 सुसंगत वर्तणुकीबाबत जनजागृती करणं, विशेषत: समाज माध्यमांचा वापर करुन कार्टुन जाहीराती, आकर्षक अशा जिंगल्स इत्यादींचा उपयोग करण्याच्या सूचना या सर्वेक्षणातून करण्यात आल्या आहेत.