मुलगा उद्धव ठाकरेंसोबत तर वडील शिंदे गटात; गजानन किर्तीकर म्हणतात, `घरात मतभेद....`
राष्ट्रवादीने संपूर्ण शिवसेना पळवली आणि अडीच वर्षे राज्य केले असेही गजानन किर्तीकर म्हणालेत
मुंबई : ठाकरे गटातील (Thackeray Group) मोठे नेते आणि खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेत शिंदे गटात प्रवेश केला आहे. गजानन किर्तीकर यांच्या प्रवेशाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरेंची साथ सोडून 13 खासदार शिंदे गटात सामील झाले आहेत. शिंदे गटातील नेत्यांप्रमाणेच गजानन किर्तीकर यांनीही अनेकदा उघडपणे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ सोडण्याचा सल्ला उद्धव ठाकरेंना दिला होता. मात्र उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबतच असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळेच गजानन किर्तीकर यांनी ठाकरे गटाची साथ सोडल्याचे म्हटले जात आहे. (mp Gajanan Kirtikar reaction on Amol Kirtikar after joining Shinde group)
गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश करताच ठाकरे गटाने त्यांची नेतेपदावरुन हकालपट्टी केली आहे. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर किर्तीकर यांनी उद्धव ठाकरेंबाबत भाष्य केले आहे. त्या शिवसेनेबद्दल (Shivsena) मला कुठलाही राग नाही. तसेच उद्धव ठाकरेंबद्दल कुठलही अवमानकारक विचार नाहीत, असे गजानन किर्तीकर यांनी म्हटले आहे.
"2019 साली ज्यावेळी शिवसेना भाजप युती असताना आमदार- खासदार निवडून आले होते. त्यामुळे युती कायम ठेवून सत्ता राबवायला हवी होती. त्याऐवजी राष्ट्रवादीने (NCP) संपूर्ण शिवसेना पळवली आणि अडीच वर्षे राज्य केले. राष्ट्रवादी प्रत्येत वेळी सरकारमध्ये समाविष्ट होऊन मंत्रीपदाची ताटे कशी मिळणार याचा ते विचार करतात. या सगळ्या परिस्थीवर तोडगा काढायचा असेल तर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांनी जी युती केली आहे ती अबाधित ठेवावी. 40 आणि 15 आमदारांना सोबत घेऊन सरकार बनवावं," असे गजानन किर्तीकर म्हणाले.
अमोल किर्तीकरांबाबत (Amol Kirtikar) स्पष्ट केली भूमिका
दरम्यान, गजानन किर्तीकर हे शिंदे गटात गेल्यानंतरही अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांनी मात्र उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नसल्याचे म्हटले आहे. मी वडिलांना समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा निर्णय वैयक्तिक असल्याचं अमोल किर्तीकर यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकतीच अमोल किर्तीकर यांची शिवसेना उपनेते पदावर नियुक्ती केली होती. त्यानंतर आता गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. गजानन किर्तीकर यांनीही मुलाच्या निर्णयाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.
"घरामध्ये मतभेद नाहीत. अमोल किर्तीकर आणि माझी चर्चा झाली आहे. मी शिंदे गटात जाणार असल्याचे त्याला सांगितले. जो विचार करताय त्याप्रमाणे कृती करा मला त्यात काही अडचण नाही, असे अमोल म्हणाला. पण मी उद्धव ठाकरेंना सोडून जाणार नाही. मी त्याच संघटनेत राहीन असे अमोल किर्तीकर म्हणाल्याचे, गजानन किर्तीकर म्हणाले.