नवनीत राणा यांचं मुख्यमंत्र्यांना खुलं आव्हान, उद्धव ठाकरे यांनी फक्त...
`शिवसैनिकांमध्ये दम आहे की हनुमान चालीसामध्ये दम आहे ते पाहूच`
मुंबई : मुंबईत सध्या शिवसेना (ShivSena) विरुद्ध राणा दाम्पत्य असा वाद उभा राहिला आहे. कीतीही रोखलं तरी मातोश्रीवर (Matoshree) जाऊन हनुमान चालीसाचं (Hanuman Chalisa) पठण करणारच असा निर्धार खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केला आहे. तर राणा दाम्पत्याने मातोश्रीवर येऊन दाखवावं असं आव्हान शिवसेनेने दिलं आहे.
दरम्यान, मुंबईत दाखल झालेल्या राणा दाम्पत्याने पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला इशारा दिला आहे. शिवसैनिकांनी आम्हाला आव्हान दिलं आहे, पण शिवसैनिकांमध्ये दम आहे की हनुमान चालीसामध्ये दम आहे ते पाहूच असं खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, दहशतवादी नाही, आम्ही शस्त्र हातात घेऊन मातोश्रीवर जात नाहीये, तर हनुमाम चालीसा घेऊन जात आहोत, असंही नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.
नवनीत राणा यांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान
यावेळी बोलताना खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही आव्हान दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालिसाच्या केवळ चार लाईन वाचून दाखवव्यात असं आव्हान नवनीत राणा यांनी दिलं आहे. बाळासाहेबांच्या विचारावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि त्यांचा मुलगा मंत्री झाले, त्यांच्या पिढीला लाभ घेण्याची सवय आहे असा टोलाही नवनीत राणा यांनी लगावला आहे.
बाळासाहेबांनी पदासाठी विचारधारा मरू दिली नाही, नेहमी समाजासाठी विचार केला. पण बाळासाहेबांची तिसरी पिढी मंत्रीपदावर जगत आहे, असा टोला नवनीत राणा यांनी लगावला आहे. मी मुंबईची मुलगी आहे आणि मी विदर्भाची सून आहे. हनुमान माझ्या पाठिशी आहेत. त्यामुळे शिवसैनिक माझं काही करू शकत नाही, असा आवहनही नवनीत राणा यांनी दिलं.
संजय राऊत म्हणजे पोपट
नवनीत राणा यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. संजय राऊत यांनी राणा दाम्पत्याचा उल्लेख बंटी-बबली असा केला, यावर बोलताना नवनीत राणा यांनी संजय राऊत हे पोपट असल्याचं म्हटलं आहे. रोज सकाळी पत्रकारांना बोलावून ते बडबड करतात, अशी टीका नवनीत राणा यांनी केली.