प्रथमेश तावडे, झी 24 तास, वसई : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक गोष्टी घडत आहेत. एकीकडे शिवसेनेतील अनेक नेते फुटून शिंदे गटात जात आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. यामध्येच खासदार राजेंद्र गावित यांची आता चर्चा रंगली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वसई-विरार सह पालघर जिल्ह्यातील शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह, कार्यकर्त्यानी काल उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. त्यामुळे कालपासून पालघर ,वसई विरारमधील शिवसेना फुटीची चांगलीच चर्चा आहे.


शिंदे यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत पालघर शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावितही यावेळी उपस्थित होते. मात्र मी अद्याप शिंदेंच्या गटात सामील झालो नसल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी केला.



मुख्यमंत्र्याशी झालेली माझी कालची भेट ही सदिच्छा भेट असून , माझ्या मतदार संघातील एमएमआरडीए तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामासंदसर्भात माहिती देण्यासाठी भेट घेतली असल्याचे स्पष्टीकरण गावित यांनी दिलं. 


शिंदे आणि ठाकरे गट एकत्र आल्यास चांगल्या प्रकारे कामे होऊ शकतात असे ते म्हणालेत. शिंदेंच्या भेटीनंतर खासदार गवितांनी दिलेल्या या स्पष्टीकरणामुळे स्थानिक शिवसेनेत मात्र संभ्रम पाहयला मिळणार आहे.