Mukesh Ambani Antilia Cost : आशियासह भारतातील श्रीमंत व्यक्ती म्हणून गणती होणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या नेतृत्त्वाखाली रिलायन्स उद्योगसमुहानं कमालीचं यश संपादन केलं आहे. विविध क्षेत्रांमध्ये व्यवसाय करणाऱ्या या उद्योगसमुहानं आजवर अनेकांनाच रोजगार दिला आहे. याच मुकेश अंबानी यांच्या व्यवसाय आणि त्यांच्या श्रीमंतीव्यतिरिक्त्सुद्धा त्यांच्या खासगी जीवनाविषयीसुद्धा अनेकांनाच कुतूहल असतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अगदी त्यांच्या आवडीच्या पदार्थापासून ते राहतात त्या भव्य वास्तूपर्यंत, कैक गोष्टी सामान्यांना थक्क करतात. जगभरातील महागड्या घरांमध्ये मुकेश अंबानी यांच्या घराची नोंद केली जाते. मुंबईत त्यांच्या घराची भव्य इमारत शहराच्या दक्षिण भागामध्ये मोठ्या ऐटीत उभी आहे. या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर 168 कारसाठी पार्किंगची व्यवस्था असल्याचं सांगण्यात येतं. 


अँटिलिया एका महालाहून कमी नाही. इथं जिम, स्पा, थिएटर, टेरेस गार्डन, स्विमिंग पूल इथपासून मंदिर, हेल्थ केअर अशाही सर्व सुविधा आहेत. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अँटिलिया उभारण्याआधी हा भूखंड कोणाकडे होता? इथं आधी कोणती वास्तू होती? 


फार आधी, आता जिथं अँटिलिया आहे तिथं एक अनाथालय होतं. करीमभाई इब्राहिम नावाच्या एका व्यक्तीनं 1895 मध्ये हे अनाथालय सुरू केलं होतं. ज्या मुलांना आई-वडिल नाहीत अशा आणि विशेष करून खोजा समुदायातील मुलांसाठी हे अनाथालय सुरू करण्यात आलं होतं. वक्फ बोर्डाच्या वतीनं हे अनाथालय चालवलं जात होतं. 2002 या वर्षात विश्वस्त मंडळानं या भूखंडाची विक्री करण्यासाठीची परवानगी मागितली. सरकारच्या वतीनं धर्मदाय संस्थांच्या कमिश्नरनं काही महिन्यांनंतर या मागणीस परवानगी दर्शवली. 


द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार मुकेश अंबानी यांच्या कंपनीला हा भूखंड विकण्यात आला. त्यांच्या अँटिलिया कमर्शियल प्राइवेट लिमिटेड या कंपनीनं त्यावेळी हा भूखंड 2.5 मिलियन डॉलर इतक्या रकमेत खरेदी केला. तेव्हा याच जमिनीला 1.5 मिलियन डॉलर इतकी किंमत मिळत होती. सर्व कागदोपत्री व्यवहार झाल्यानंतर अंबानी कुटुंबानं या जागेवर इमारत उभारणीसाठी परवानगी मागितली. 2003 मध्ये मुंबई महानगरपालिकेनं या ठिकाणी इमारती उभारण्यासाठीची परवानगी दिली आणि 2006 मध्ये इमारतीचं बांधकाम सुरू झालं. 


आजच्या घडीला अँटिलियाची किंमत 15000 कोटी रुपये सांगितली जात आहे. मुंबईच्या कुम्बाला हिल येथील अल्टामाउंट रोडवर असणारी ही इमारत 1.120 एकरच्या भूखंडावर उभी आहे. 2014 या वर्षात या इमारतीला जगातील सर्वात महागडं घर म्हणून गणलं गेलं. या भव्य वास्तूच्या उभारणीसाठी 6000 कोटी रुपये इतका खर्च आला. जवळपास चार वर्ष या इमारतीचं बांधकाम सुरू होतं, अखेर 2010 मध्ये हे बांधकाम पूर्ण झालं. 


हेसुद्धा वाचा : भारताच्या शीरस्थानी असणाऱ्या लडाखवर पुन्हा चीनची वक्रदृष्टी; परराष्ट्र मंत्रालयाकडून कडाडून विरोध


जमिनीपासून उंचावर असण्यासोबतच अँटिलियाचं बांधकाम अशा पद्धतीनं करण्यात आलं आहे की, ही इमारत 8 रिश्टर स्केलपर्यंतचा भूकंपही झेलू शकते. अंबानींच्या या प्रासादाचं नाव स्पेनमधील एका बेटावरून ठेवण्यात आलं आहे. अमेरिकन आर्किटेक्चर कंपनी पर्किन्स एंड विल यांनी हे घर डिझाईन केलं असून, या घरात 600 लोक काम करतात असं सांगितलं जातं. याबबातची अधिकृत माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाही.