अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई : मुलुंडच्या मॉलमध्ये एस्कलेटरवर लहान मुलाचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर पालकांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे. तुमच्या लहान मुलांसह जर तुम्ही एखाद्या शॉपिंग मॉलमध्ये गेलात आणि तिथे एस्कलेटर म्हणजे सरकते जिने असतील तर मुलांकडे नीट, काटेकोर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मुंबईतल्या मुलुंडमधल्या आर मॉलमध्ये अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे, या प्रकरणी आर मॉलनेही खेद व्यक्त केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलुंडच्या आर मॉलमध्ये दीड वर्षाचा चिन्मय त्याच्या आई वडिलांबरोबर गेला होता. आई-बाबांचं लक्ष नसताना चिन्मय एस्कलेटवर गेला. त्याने एस्कलेटर चढण्याचा प्रयत्न केला. पण चिन्मय एस्कलेटवर पडला आणि त्याच्या हाताची ३ बोटं एस्कलेटरमध्ये अडकली. 


आई-वडील तिथे पोहोचेपर्यंत तीनही बोटं वेगळी झाली होती. त्याच्या बोटांच्या नसा दबल्या गेल्याने तीनही बोटं डॉक्टरांना पुन्हा जोडता आली नाहीत. 


तज्ज्ञांच्या मते सरकत्या जिन्यांनाही सेन्सर्स असतात. या सेन्सर्समध्ये एखादा अडथळा आलाच तर हे सरकते जिने लगेच बंद होतात. तसं इथे झालं नाही. एस्कलेटरच्या वर-खाली जाणाऱ्या दोन्ही मार्गांवर निरिक्षण करण्यासाठी, लिफ्टमध्ये ज्याप्रमाणे अटेंडन्ट असतो, त्याचप्रमाणे एस्कलेटरजवळही प्रशिक्षित अटेंडन्ट असणं गरजेचं असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. 


एस्कलेटर्सवर मुलांकडे नीट लक्ष दिलं नाही, तर काय होतं, याचं हे धक्कादायक उदाहरण आहे. आपल्या मुलांकडे अतिसय कटाक्षाने लक्ष देणं गरजेचं असून, यातून धडा घ्यायला हवा.