Salman Khan : अभिनेता सलमान खानच्या मुंबईतल्या वांद्रे इथे असलेल्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. गुजरातच्या भुजमधून दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या. विक्की गुप्ता आणि सागर पाल अशी या दोघांची नावं आहेत. या दोन्ही आरोपींचं बिहार कनेक्शन (Bihar Connection) समोर आलंय. विक्की गुप्ता आणि सागर पाल हे दोघेही बिहारमध्ये राहणारे शूटर्स आहेत. शूटर विक्की गुप्ताचं वय 24 वर्ष तर दुसरा शूटर सागर पालचं वय अवघं 21 वर्ष आहे. सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या या आरोपींकडून विदेशी पिस्तुलसह जिवंत काडतुसं, मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय रॅकेट
पोलिसांच्या दाव्यानुसार हे एक आंतरराष्ट्रीय रॅकेट (Internation Racket) आहे. ज्याचं बिहार आणि गुजरात कनेक्शन असल्याचा पोलिसांना संशय आहे. तसंच हे दोन्ही आरोपी लॉरेन्स गँगचे (Lawrence Bishnoi) शूटर्स असल्याचा संशय पोलिसांना आहे.  सलमानच्या घरावर गोळीबार करणारे दोन्ही आरोपी पनवेलमध्ये (Panvel) एका भाड्याच्या घरात राहत होते. पनवेलमधल्या हरिग्राम गावातली  राधाकृष्ण इमारतीत हे आरोपी भाड्याने राहत होते. आणि याच ठिकाणावरुन दोघे एका महिन्यापासून सलमानच्या मुंबईतल्या घराची रेकी करत होते. गोळीबार केल्यानंतर हे दोघे पुन्हा पनवेलच्या घरात आले, आणि इथूनच त्यांनी पळ काढला. 


पोलिसांनी आता पनवेलच्या ज्या घरात आरोपी राहत होते, त्या घराचा मालक, बाईकचा मूळ मालक आणि सकाळी त्यांना घरापर्यंत सोडणाऱ्या रिक्षा चालकालादेखील चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. पनवेलमध्ये हे आरोपी जिथे राहत होते, त्यांच्या घरापासून सलमान खानचं कर्जतचं फार्म हाऊसही 10 किलोमीटर अंतरावर आहे.. त्यामुळे त्यांनी फार्म हाऊसची देखील रेकी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. तेव्हा या आरोपींच्या टार्गेटवर सलमान खानचं फार्महाऊसही होतं का असा प्रश्न निर्माण होतोय.  


घटनेवरुन आरोप प्रत्यारोप
दरम्यान, महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलाय. त्याचबरोबर सलमान खानच्या घरावर गोळीबार केलेल्या गँगला महाराष्ट्र पोलीस धडा शिकवेल असा दावाही त्यांनी केलाय. मुख्यमंत्र्यांनी आज सलमान खानची त्याच्या राहत्या घरी भेट घेतली. त्यानंतर ते बोलत होते. तर गुंडांना जी भीती असायला पाहिजे, ती आता राहिली नाही असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे. तसंच अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली. आता सलमान खान यांच्या घरांवर गोळीबार झाला. जर गुंड मंत्रालयात जाऊन रिल्स काढायला लागले तर सरकारचं लक्ष कुठेय, असा सवाल करत त्यांनी  सरकारवर हल्लाबोल केलाय...