AC लोकलमध्ये TC ला मारहाण करणाऱ्या अनिकेत भोसलेच्या जीवाला धोका? म्हणाला, `परराज्यातून...`
Mumbai AC Local News Life In Danger: 15 ऑगस्ट रोजी घडलेल्या या प्रकरणामध्ये दिवसोंदिवस वेगवेगळे फाटे फुटत असतानाच आता या प्रकरणामध्ये टीसीला मारहाणाऱ्या प्रवाशाने खळबजनक दावा केला आहे.
Mumbai AC Local News Life In Danger: चर्चगेट-विरार एसी लोकलमध्ये 15 ऑगस्ट रोजी तिकीट तपासणीसाला म्हणजेच टीसीला मारहाण झाल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता या प्रकरणाला नवीन फाटे फुटत आहेत. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दोन दिवसांनी पश्चिम रेल्वेने सोशल मीडियावरुन घडलेल्या प्रकरणाचं स्पष्टीकरण दिलं. मात्र मारहाण करण्यात आलेला टीसी शीख असल्याने या प्रकरणावरुन आता शीख समाजामध्ये नाराजी असल्याची माहिती समोर येत असून मारहाण करणाऱ्यांना या समाजाकडून धमकावलं जात असल्याची चर्चा आहे.
धमकीचे फोन
बोरिवली आणि अंधेरीदरम्यान या टीसीची एका प्रवाशाबरोबर एसी लोकलचं तिकीट नसल्याच्या मुद्यावरुन बाचाबाची झाली. यामध्ये अन्य प्रवाशांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला असताना त्यांचीच टीसीबरोबर हाणामारी झाली. टीसीला हाणामारी करणाऱ्यांमध्ये अनिकेत भोसले नावाचा तरुणही होता. या तरुणाने सदर प्रकरणानंतर माफी मागितली असून बिनशर्त माफी मागणारं पत्रच पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिलं आहे. मात्र या प्रकरणाचं भूत अनिकेत भोसलेच्या मानगुटीवरुन उतरण्यास तयार नाही. आता अनिकेत भोसलेला शीख समुदायाकडून सोशल मीडिया आणि फोनवरुन धमकीचे फोन येत असल्याचा दावा त्यानेच केला आहे.
जीवाला धोका?
घडलेल्या प्रकाराबद्दल आपण जाहीर माफी मागत असल्याचं अनिकेतने म्हटलं आहे. टीसीनेच आपल्यावर पहिल्यांदा हात उचलल्याचा दावा अनिकेतने केला असून टीसीच्या दाढीला हात लावण्याचा आपला कोणताही इरादा नव्हता असं म्हटलं आहे. तसेच सदर विषय इथेच थांबवायला हवा अशी विनंतीही अनिकेतने केली आहे. अनिकेत भोसलेने त्याच्या जीवाला धोका असल्याचं सूचक विधान केलं आहे. माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला पोलीस जबाबदार असतील, असं अनिकेतने म्हटलं आहे. 'परराज्यामधून मला धमकीचे फोन येत आहेत,' असं अनिकेतने म्हटलं आहे.
अनिकेतने दिलेलं माफीचं पत्र
सदर प्रकार घडल्यानंतर अनिकेतने रितसर पत्र लिहून माफी मागितली होती. "मी अनिकेत अशोक भोसले, आज दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी 94051 एसी लोकलने 1509 या तिकीट नंबरने अंधेरीवरुन ट्रेनमध्ये विरारला जाण्यासाठी चढलो. बोरिवली स्टेशनआधी आणि अंधेरी बोरीवलीदरम्यान तिकीट तपासणीस तकीट चेक करत होते. त्यावेळेस तिकीट तपासणीस जसबीर सिंग हे इतर कोणत्यातरी प्रवाशाचं तिकीट तपासत असताना दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यावेळेस मी दोघांमधील वाद मिटवण्याच्या उद्देशाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी माझी जसबीर सिंग यांच्याबरोबर बाचाबाची झाली. कर्तव्यावर असताना म्हणजेच ऑन ड्युटी असताना जसबीर सिंग यांच्याबरोबर मी अशी वागणूक करणं अपेक्षित नव्हतं. मी असं करायला नको होतं. जे घडलं त्याबद्दल मला खेद आहे. मी जे काही केलं आहे त्यासाठी माफी मागतो. मी भविष्यात अशा पद्धतीचं वर्तन करणार नाही. मला जसबीर सिंग यांच्याबद्दल मनात कोणताही द्वेष नाही. तसेच त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात यावी अशीही माजी मागणी नाही. मी केलेल्या या वागणुकीसाठी मला माफ करावे," असं या पत्रात म्हटलं आहे.
कारवाई न करता सोडून दिलं
बिनशर्त माफी मागितल्याने कारवाई न करतानाच मारहाण करणाऱ्यांना सोडून दिल्याचं पश्चिम रेल्वेने सांगितलं. "हा प्रकार 15 ऑगस्ट रोजी घडला आहे. या प्रकरणामध्ये एसीने प्रवास करणाऱ्या तीन प्रवाशांकडे फर्स्ट क्लासचं तिकीट असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांना प्रवास भाडं आणि दंड भरण्यास सांगण्यात आलं. टीसी आणि प्रवाशांमध्ये ही चर्चा सुरु असतानाच या प्रकरणाशी संबंध नसणारे तीन अन्य प्रवाशी तेथे आले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यांनी टीसीबरोबर गैरवर्तन केलं. आरपीएफ, जीआरपीला पाचारण करण्यात आलं. त्यांना पाहून मारहाण करणाऱ्या तिन्ही प्रवाशांनी बिनशर्त लेखी माफी मागण्याची तयारी दर्शवली. म्हणून त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई न करता त्यांना सोडून देण्यात आलं," असं स्पष्टीकरण पश्चिम रेल्वेने दिलं.
बोरिवली पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.