चंद्रशेखर भूयार, झी मीडिया, बदलापूर : मध्य रेल्वेच्या (Central Railway) प्रवाशांसाठी अतिशय मोठी बातमी. संध्याकाळची बदलापूर एसी लोकल (Badlapur AC Local) बंद करण्याचं आश्वासन रेल्वेनं दिलंय. ही एसी लोकल सोडण्यासाठी सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवासी प्रचंड संतप्त झाले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वसामान्य लोकल वातानुकुलित लोकलमध्ये बदलून वातानुकुलीत लोकलच्या फेऱ्या सुरू केल्या जात असल्याने सर्वसामान्य प्रवाशांमध्ये संताप आहे. तिसऱ्या दिवशीही बदलापूरकरांनी एसी लोकल विरोधात आंदोलन केलं. याविरूद्धी बदलापूर स्थानकात संतप्त प्रवाशांनी रेल्वे स्थानक व्यवस्थापकांच्या कार्यालयाबाहेर गर्दी जमवून घोषणाबाजी केली. वातानुकूलित लोकल बंद करण्याची मागणी यावेळी प्रवाशांनी केली.


प्रवाशांचा खोळंबा होत असल्यानं सलग तीन दिवस बदलापूर स्थानकावर प्रवाशांचा उद्रेक होत होता. आजही संतप्त प्रवाशांनी आंदोलन केल्यानंतर अखेर रेल्वे प्रशासनानं ही संध्याकाळच्या वेळची एसी लोकल बंद करण्याचं आश्वासन दिलं.  तसंच नव्याने चालवण्यात येणाऱ्या एसी लोकलच्या दहा फेऱ्याही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जागी सामान्य लोकल चालवल्या जाणार आहेत.


मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकलला विरोध
रेल्वे प्रवाशांचा प्रवास गारेगार व्हावा यासाठी पश्चिम (Western) आणि मध्य रेल्वे (Central Railway) मार्गावर एसी लोकल (AC Local) सुरु करण्यात आल्या. मात्र एसी लोकलचं तिकिट अधिक असल्याने प्रवाशांनी एसी लोकलकडे पाठच फिरवली आहे. इतकंच नाही तर एसी  लोकलविरोधात प्रवाशांचा रोषही वाढत चालला आहे. सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द करुन एसी लोकलच्या फेऱ्या वाढवल्याने प्रवाशांची नाराजी ओढवून घेतली आहे. 


मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या किती फेऱ्या
मध्य रेल्वे मार्गावर सध्या सहा एसी लोकल असून दररोज 66 फेऱ्या होतात. सीएसएमटी ते कल्याण, अंबरनाथ, बदलापूर आणि टिटवाळा अशा एसी लोकलच्या फेऱ्या आहेत. हार्बर आणि ट्रान्स हार्बरवरही एसी लोकल सुरु करण्यात आल्या होत्या पण प्रवशांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने हार्बर मार्गावरील एसी लोकल बंद करण्याशिवाय पर्याय नव्हता.