मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलच्या तिकिट दरात १ जूनपासून वाढ करण्यात येणार आहे. यामुळे चर्चगेट ते विरारसाठी वातानुकूलित प्रवासासाठी प्रवाशांना २२० रुपये मोजावे लागणार आहेत. तिकिट दरवाढीनंतर वातानुकूलित लोकलचे एकल दिशेचे किमान तिकिट ६५ आणि कमाल तिकिट २२० रुपये असणार आहे. मात्र शनिवार, रविवार एसी लोकल धावत नसल्यामुळे प्रवाशांना ३ जून पासून जादा तिकिट दर सोसावे लागणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डिसेंबर २०१७ पासून उपनगरीय मार्गावरील देशातील पहिली एसी लोकल सुरु झाली आहे. चर्चगेट ते विरार दरम्यान एसी लोकलच्या १२ फेऱ्या चालविण्यात येतात. एसी लोकलचे पहिल्या सहा महिन्यांसाठीचे किमान तिकिट जीएसटीसह ६० रुपये तर कमाल तिकिट २०५  रुपये ठेवण्यात आले होते. जनसामान्यांमध्ये वातानुकूलित लोकलची लोकप्रियता वाढवण्यासाठी एसी लोकलच्या तिकिट दरांमध्ये उद्घघाटन विशेष दर आकारण्यात आले होते.


सध्याचे एकेरी प्रवासी भाडे


चर्चगेट - मुंबई सेंट्रलः ६० रुपये


चर्चगेट - दादर: ८५ रुपये


चर्चगेट - बांद्रा: ८५ रुपये


चर्चगेट - अंधेरीः १२५ रुपये


चर्चगेट - बोरिवली: १६५ रुपये


चर्चगेट - भाईंदर: १७५ रुपये


चर्चगेट - वसईः १९५ रुपये


चर्चगेट - विरार: २०५ रुपये


यानुसार २५ डिसेंबर २०१७ ते ३१ मे २०१९ या काळात प्रथम दर्जा तिकिट दरांच्या १.२ पटीने वातानुकूलित तिकिट दर आकारले जात होते. आता हे विशेष दर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने १ जून पासून प्रथम दर्जाच्या १.३ पट या दराने तिकिट आकारण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे. वातानुकूलित लोकलच्या तिकीट दरवाढीवनूसार, चर्चगेट ते प्रभादेवी प्रवासासाठी ६५ रुपये,  चर्चगेट ते दादर प्रवासासाठी ९० रुपये, चर्चगेट ते अंधेरी प्रवासासाठी १३५ रुपये, चर्चगेट ते बोरिवलीसाठी १८० रुपये, चर्चगेट ते भाईंदरसाठी १९० रुपये आणि चर्चगेट ते विरारसाठी २२० रुपये मोजावे लागणार आहे. 


१ जूनच्या आधी मासिक, त्रैमासिक पास काढलेल्या प्रवाशांकडून नवीन तिकिट दरांच्या वसूलीची रक्कम वसूल करण्यात येणार नाही. या पासची मुदत संपल्यानंतर प्रवाशांना सुधारित दरांप्रमाणे पास खरेदी करावा लागणार आहे.