`अदानी इलेक्ट्रीसिटीकडून चुकीची वीज बिले पाठवून मुंबईकरांची लूट`
मीटर रिडींग न करताच अदानी इलेक्ट्रिसिटीने ग्राहकांना वीज बिले पाठवण्याचा ठपका समितीने ठेवला आहे.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : रिलायन्स इलेक्ट्रिक कंपनीकडून मुंबई उपनगरातील वीज वितरणाचे काम अदानी इलेक्ट्रिसिटीकडे गेल्यानंतर वीज ग्राहकांना चुकीची बिले पाठवून अदानी कंपनीने ग्राहकांची लूट केल्याचे समोर आले आहे. अदानी कंपनीने ऑगस्ट 2018 साली रिलायन्स इलेक्ट्रिक कंपनी विकत घेतली. त्यानंतर मुंबईतील वीज ग्राहकांना अचानक वाढीव बिले आली होती. याबाबत ग्राहकांनी वीज नियामक आयोगाकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन वीज नियामक आयोगाने याची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली होती. या समितीने वाढीव वीज बिलांबाबत अदानी इलेक्ट्रिसिटीवर ठपका ठेवला आहे. मीटर रिडींग न करताच अदानी इलेक्ट्रिसिटीने ग्राहकांना वीज बिले पाठवण्याचा ठपका समितीने ठेवला आहे.
काय म्हणतो अहवाल ?
- ऑगस्ट 2018 मध्ये वीज ग्राहकांना पाठवलेली बिले रिडिंग न घेता तयार करण्यात आली होती
- यासाठी आधीच्या दोन महिन्यांची म्हणजेच मे, जून या महिन्यातील वीज बिलाच्या रकमेची सरासरी काढण्यात आली होती
- या महिन्यात उन्हाळ्यामुळे वीजेचा वापर वाढलेला असतो, तसंच वापर वाढल्याचे दाखवत स्लॅब बदलत असल्याने ही वाढीव बिले तयार करण्यात आली
- योग्य नियोजना अभावी अदानीने जादा दरान वीज खरेदी केल्याने त्याचा फटका ग्राहकांना सोसावा लागला
असा ठपका समितीने चौकशी अहवालात ठेवला आहे
वीज ग्राहकांनी तक्रार केल्यानंतर वीज नियामक आयोगाने अदानी इलेक्ट्रिसिटीला नोटीसही पाठवली होती. तसेच नोव्हेंबर 2018 मध्ये या वाढीव बिलांच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी वीज नियामक आयोगाने एका चौकशी समितीची स्थापना केली होती. त्या समितीचा अहवाल नियामक आयोगाला काल सादर झाला आहे.